मनसुख हिरेन हत्या : अँटिलिया स्फोटक प्रकरणातील संशयित रियाजुद्दीन काझीला जामीन मंजूर | पुढारी

मनसुख हिरेन हत्या : अँटिलिया स्फोटक प्रकरणातील संशयित रियाजुद्दीन काझीला जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन : मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी रियाजुद्दीन काझीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळील वाहनात स्फोटके सापडणे आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या संगनमताने पुरावे नष्ट केल्याप्रकरणी रियाजुद्दीन काझी याला अटक करण्यात आली होती.

एनआयएने 2021 मध्ये अँटिलिया स्फोटक प्रकरणी मुंबईतील बडतर्फ पोलिस रियाजुद्दीन काझी याला अटक केली होती. त्याला आता जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने एनआयएला या केस प्रकरणात मोठा धक्का बसला आहे.

मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील संशयित आरोपी रियाझुद्दीन काझी याला मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला आहे. दरम्यान न्यायालयाने रियाझुद्दीन काझी याला पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे. तसेच महिन्यातील दर शनिवारी एनआयए कार्यालयात हजर राहण्याच्या सूचनाही न्यायालयाने संशयित आरोपीला दिल्या आहेत.

संशयित आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे तुरुंगातच

याप्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. अलीकडेच वाझे यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातून बरे होण्यासाठी त्यांनी मला घरीच नजरकैदेत ठेवण्यात यावं, अशी मागणी केली होती. पण राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांनी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला विरोध केला आहे. वाझेंची नजरकैदेची याचिका मंजूर झाल्यास ते फरार होऊ शकतात, अशी भीती एनआयएने न्यायालयात व्यक्त केली आहे.

Back to top button