पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात गोपनीय अहवाल लीक झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रविवार चौकशी करण्यात आली. यावरून भाजपने आक्रमक होत राज्य सरकारवर आक्षेप घेतले. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (सोमवार) विधानसभेत उत्तर दिले. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले जात नाही. त्यांना कटात सामील करण्याचा कोणताही संबंध नाही. तसेच विरोधी पक्षनेत्यांच्या विशेषाधिकाराचे हनन करण्याचा प्रश्नच येत नाही. हा विषय या ठिकाणी थांबवावा, असे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करणाऱ्या पोलील अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणावा, अशी मागणी भाजप नेते सुधीर मनगुंटीवार यांनी विधानसभेत केली. फडणवीस यांना चौकशीसाठी बजावलेल्या नोटीसीबाबत विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. यावर बोलताना मनगुंटीवार यांनी स्थगन प्रस्ताव मान्य करून संरक्षण देण्याची मागणी केली.
मनगुंटीवार म्हणाले की, फडणवीस यांनी राज्यातील भ्रष्टाचार बाहेर आणला आहे. राज्यात नियमांचे उल्लंघन होत आहे. पोलिसांचे राजकीयकरण झाले आहे. पुरावे, माहिती दिली तरी कारवाई होत नाही. भ्रष्टाचारी लोकांना मदत केली जात आहे. तर भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या लोकांना त्रास दिला जात आहे. विशेषाधिकार असतानाही पोलीस फडणवीसांच्या घरी कसे गेले, असा प्रश्नही मनगुंटीवार यांनी यावेळी केला. राज्यात जे काही सुरू आहे, ते चांगलं नाही. फडणवीसांच्या घरी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणावा, अशी मागणी यांनी केली.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : झुंड सिनेमा ज्यांच्यावर आधारित आहे त्या विजय बारसेंना काय वाटतं 'झुंड'विषयी ?