Winter session of Maharashtra : हिवाळी अधिवेशनाचे ३० डिसेंबरलाच सूप वाजणार

हिवाळी अधिवेशन नागपूर
हिवाळी अधिवेशन नागपूर

नागपूरः पुढारी वृत्तसेवा : नागपुरात सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी सातत्याने विरोधी पक्षांकडून करण्यात आली. मात्र, बुधवारी (दि.२८) पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधकांची मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन आता नियोजित कालावधीतच म्हणजे शुक्रवारी (दि. ३०) संपणार असल्याचे स्पष्ट झाले.

१९ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. विदर्भ, मराठवाड्याचे विषय कालपासून चर्चेला आले. अधिवेशनाचा कालावधी अपुरा असल्याने कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी सुरुवातीपासून विरोधकांकडून सुरु होती. अधिवेशनात नेत्यांचे घोटाळे, त्यांच्यावरचे आरोप- प्रत्यारोप या विषयांवरच मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्यामुळे जनतेचे प्रश्न मागे पडल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. यामुळे नागपूर कराराप्रमाणे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. मात्र, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशन ३० तारखेलाच संपणार आहे. उद्या गुरुवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

आमची तयारी होती : दरेकर

दरम्यान, यासंदर्भात बोलताना भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत अधिवेशन ३० तारखेपर्यंत घेण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय विरोधकांच्या समन्वयाने झाला आहे. विरोधकांची मानसिकता अधिवेशन कालावधी वाढवण्याची असती तर आमचीही तयारी होती. परंतु, ३० तारखेपर्यंत अधिवेशन आटोपण्याचा निर्णय विरोधकांच्या समन्वयाने झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news