नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट-पीजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ईडब्ल्यूएस आरक्षणाशी संबंधित खटल्यांची सुनावणी उद्या बुधवारी (दि.५) रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. सदर विषय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाशी निगडित असल्यामुळे त्याची सुनावणी लवकर घेतली जावी, अशी विनंती नुकतीच केंद्र सरकारकडून खंडपीठाला करण्यात आली होती.
तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ईडब्ल्यूएस आरक्षणाशी संबंधित खटले प्रलंबित आहेत. नीट- पीजी कौन्सिलिंग तसेच प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात ईडब्ल्यूएस वर्गाची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत निश्चित ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. याबाबतची माहितीही सरकारने न्यायालयाला दिली होती.
दुसरीकडे ईडब्ल्यूएस आरक्षणालाच आक्षेप घेत न्यायालयात असंख्य याचिका दाखल झालेल्या आहेत. नीट- पीजी प्रवेश प्रक्रिया लांबल्याने दिल्लीत निवासी डॉक्टरांनी संप केला होता. डॉक्टरांची चिंता उचित असल्याचे म्हणणे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी सुनावणीदरम्यान काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचलंत का?