प्रेरणादायी : महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळेच्या खडतर परिश्रमाची कथा

प्रेरणादायी : महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळेच्या खडतर परिश्रमाची कथा

मुंबई;पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याने बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात मिळवलेले रौप्यपदक लक्षणीय ठरले. या विक्रमी कामगिरीचे श्रेय त्याने घरापासून दूर असलेल्या शाळा गाठण्याच्या दौडीला दिले आहे.

सहा वर्षांचा असल्यापासून मला लांब पल्ल्याचे अंतर पार करण्याची सवय होती. माझ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचे हेच गमक आहे, असे अविनाश याने म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेल्या अविनाशचे घर आणि प्राथमिक शाळा यांच्यात सहा किलोमीटरचे अंतर होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तसेच घर ते शाळा दरम्यान कुठलेही वाहतुकीचे साधन नसल्याने तो रोज चालत किंवा धावत हे अंतर पार करावे लागत होते.

मात्र, मोठा खेळाडू बनण्याच्या जिद्दीने भारलेल्या अविनाशने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे 12वीपर्यंत शिकल्यानंतर भारतीय लष्करामध्ये तो भरती झाला.अविनाशचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. दुसर्या क्रमांकावरील साबळे याने प्रस्तावित अंतर 8:11.20 सेंकदात पार केले. केनियाच्या अब्राहम किबीवॉटने 8:11.20 सेंकद अशा वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले.
साबळेची ही कामगिरी नवा राष्ट्रीय विक्रम ठरला आहे. त्याने नवव्यांदा त्याच्या नॅशनल रेकॉर्डमध्ये नव्याने भर घातली. राष्ट्रकुल पदकाने
अविनाशसह भारताच्या शिरपेचात नवा तुरा रोवला गेला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3 हजार स्टीपलचेस प्रकारात 1994 स्पर्धेनंतर पदक मिळवणारा केनियावगळता पहिला अ‍ॅथलीट ठरला.
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकी कामगिरीनंतर अविनाश याने आगामी लुसान डायमंड लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरीचे लक्ष्य ठेवले आहे. ही स्पर्धा 26 ऑगस्टपासून खेळली जाणार आहे. 27 वर्षीय अविनाश हा भारतीय लष्करामध्ये फाइव्ह महार रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे. 2013-14मध्ये सियाचिन ग्लॅशियर येथे त्याची नियुक्ती झाली आहे.

आर्थिक चणचण कायम

ऑलिम्पिकमधील सहभागासह राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवले तरी महाराष्ट्राच्या गुणवान क्रीडापटूला अद्याप आर्थिक स्थैर्य मिळाले नाही. इतर राज्यांतील खेळाडूंप्रमाणेच त्याला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्याच्या आईवडिलांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी आष्टीचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांना दिेले आहे. सदर पत्र जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, साबळे कुटुंबियांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारकडे मदतीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news