तळवडे अग्निकांडातील मृतांची संख्या नऊ ; कारखान्याच्या जागा मालकासह तिघांना अटक

तळवडे अग्निकांडातील मृतांची संख्या नऊ ;  कारखान्याच्या जागा मालकासह तिघांना अटक
Published on
Updated on
पुणे/पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जखमी रुग्ण शिल्पा राठोड (वय 31 वर्षे) यांचे ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. या घटनेतील मृतांची संख्या आता 9 झाली आहे. दरम्यान, या स्पार्कल  फायर कॅन्डल कारखान्याला लागलेल्या आग दुर्घटनेप्रकरणी कारखान्याच्या  जागा मालकासह कारखाना चालविणार्‍या महिलेस व साहित्य पुरवठादाराला पोलिसांनी अटक केली असून, त्यांना मंगळवार (दि. 12) डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तळवडे येथील आगीत 6 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता, तर 10 जण जखमी झाले होते. जखमींवर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी उपचार सुरू असताना प्रतीक्षा तोरणे (वय 16 वर्षे) आणि कविता राठोड (वय 45 वर्षे) यांचे निधन झाले. त्यानंतर 8 रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यातील शिल्पा राठोड (वय 31 वर्षे) यांचे रविवारी निधन झाले. सध्या 7 रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या :
या प्रकरणी जागा मालक नजीर अमीर शिकलगार (रा. मोहननगर, चिंचवड )  यासह कारखाना चालविणार्या शुभांगी शरद सुतार (35, रा. पिंपरी सांडस, ता. खेड), पुरवठादार सागर रमेश भक्कड (37, रा. सिंहगड रोड, धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शरद सुतार (45, रा. पिंपरी सांडस, ता.खेड), जन्नत नजीर शिकलगार (रा. संतोषीमातानगर, मोहननगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
'घातक उद्योगांची माहिती जमा करा'
पिंपरी : धोकादायक व घातक साहित्य,माल व पदार्थांमुळे अपघात होतात. अशा घातक मालाचा वापर व साठा करणार्या पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योग व व्यवसायांची तात्काळ माहिती जमा करा. त्या भागांत सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकार्यांना दिल्या. तळवडे येथील कारखान्यात आग लागून 8 महिलांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
 ससूनमध्ये मदत कक्ष 
तळवडे आग दुर्घटनेतील जखमी रूग्णांवर पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रुग्णांना तसेच, त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ससून रुग्णालयामध्ये मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.
 अद्याप अंत्यसंस्कार नाहीत
आगीत मृत झालेल्या आणि ओळख न पटलेल्या 6 महिला आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डीएनए चाचणीचा अहवाल अद्याप पुण्यातील़ न्याय वैद्यकवैज्ञानिक प्रयोगशाळेकडून आलेला नाही. त्यामुळे संबंधित महिलांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकलेले नाहीत. हा अहवाल सोमवारी (दि. 11) पोलिसांकडून मिळण्याची शक्यता आहे.
कारखान्याची नोंद नाही
संबंधित कारखान्याची अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात नोंद आढळलेली नाही; तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची देखील त्यांनी परवानगी घेतली नसल्याची नवीन माहिती पुढे आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news