आंतरराष्ट्रीय पर्वत दिन विशेष : पर्वत आयुष्याचा भाग बनणे आवश्यक

 आंतरराष्ट्रीय पर्वत दिन विशेष : पर्वत आयुष्याचा भाग बनणे आवश्यक
Published on
Updated on
दुर्मीळ वनस्पती, फुले, फळे, प्राणी, पक्षी यांचा अधिवास हा पर्वताच्या सान्निध्यात सापडतो. जीवनदायी नद्या, पाण्याचे स्रोत यांचा उगम हा पर्वतांतच, अगदी पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेला वारा हा पर्वतांमुळेच अडतो. पर्वत हे फक्त उपभोगाचे साधन न राहता आपल्या आयुष्याचा भाग बनवणे आवश्यक आहे. मात्र, आपण पर्वतांचा र्‍हास करण्याच्या मागे लागलो आहोत, हे कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्वतांवरील जैवविविधता टिकवणेही काळाची गरज बनली आहे.
आपल्या गरजा भागविण्यासाठी आपण स्वार्थी होतो आणि त्यातून आपला हा बालपणीचा पर्वत मित्र आपणच दूषित करतो. त्यामुळे या महत्त्वाच्या नैसर्गिक पैलूला अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. याची सुरुवात 2003  मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने पर्वतांमध्ये शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी केली आहे. गिरीप्रेमी आणि अखिल भारतीय गिर्यारोहण महासंघ गेली दहा वर्षे हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि विविध उपक्रमांचे आयोजन करतात.
पर्वताच्या संवर्धनासाठी गिरीप्रेमी आणि अखिल भारतीय गिर्यारोहण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पर्वतपूजन केले जाते. यावर्षीची जैवविविधता ही थीम असल्याने महासंघाच्या वतीने पर्वत पूजनाबरोबरच जैवविविधता संवर्धनाचा संदेश ही देण्यात येणार आहे.
जैवविविधतेमध्ये विस्ताराची विविधता
जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये विस्ताराची विविधता आढळते. एवढेच नव्हे, तर एकाच प्रदेशामध्येसुद्धा सारखेपणा आढळून येत नाही. सजीवांमधील विविधता ही तापमान, पडणार्‍या पावसाचे प्रमाण, समुद्रसपाटीपासूनची उंची, भूप्रदेशाचे गुणधर्म आणि सभोवती असलेल्या इतर सजीवांच्या अस्तित्वावर अवलंबून असते.
… तरच पर्वतावरील जैवविविधता बहरणार
तब्बल 33 लाखांहून अधिक वृक्षसंपदा, 18 टेकड्यांनी वेढलेले शहर, मुबलक पाणी, शुद्ध हवा आणि पुरेसा सूर्यप्रकाश असलेले शहर जैवविविधतेने समृद्ध झाले आहे. मात्र, अवाजवी मानवी हस्तक्षेपामुळे ही विविधता धोक्यात येत आहे. त्याचा विपरीत परिणाम पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी तसेच वनस्पतींवर होत आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन करण्यासाठी पुणेकरांनीही जागरूक होण्याची गरज आहे. तरच शहरातील जैवविविधता बहरणार आहे.
पर्वत हा पृथ्वीवरील अमूल्य ठेवा आहे व तो जपण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत, हेच विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्था दिनांक 11 डिसेंबर रोजी निसर्ग व पर्वत संवर्धनाची माहिती सांगणारा लघुपट पुण्यातील 50 शाळांमध्ये दाखविणार असून, शालेय विद्यार्थ्यांसोबत पर्वतांचे व त्यावर आधारित मानव सृष्टीचे महत्त्व याबद्दल संस्थेचे गिर्यारोहक संवाद साधणार आहेत.
                                                        – उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल भारतीय गिर्यारोहण महासंघ.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news