CM Eknath Shinde : राज्यातील सरकार स्थिर – एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde : राज्यातील सरकार स्थिर – एकनाथ शिंदे
Published on
Updated on

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : आमचे सरकार लोकांच्या मनातील सरकार आहे. गेल्या चार महिन्यांत राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. विरोधकांकडून सरकार पडणार असल्याचे बोलले जात असले तरी आमच्याकडे १७० आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे राज्यातील सरकार स्थिर आहे. आम्ही खोके देणारे नाहीत, तर २०० कोटींच्या विकासकामांचे खोके दिले आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी भंडारा येथे विरोधकांना दिले.

भंडारा विधानसभा क्षेत्रातील २०० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व जलपर्यटनाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज भंडारा येथे आले होते. त्यानंतर खातरोडवरील रेल्वे मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  म्हणाले, केंद्र सरकारने राज्यासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. यापुढे एकही प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जे प्रकल्प राज्याबाहेर गेले ते आधीच्या सरकारमुळे गेले आहेत. कोणताही प्रकल्प एकदोन महिन्यात जात नाही. गेल्या चार महिन्यात राज्याच्या विकासाला मिळालेल्या गतीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याची टीका त्यांनी केली.

चार महिन्यात ७२ लोकोपयोगी निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ७ हजार कोटींची मदत केली. धानाला बोनस देण्यासाठी उपसमिती गठीत करण्यात आली असून बोनससाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगून त्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्प अथांग सागरासारखा दिसतो. या प्रकल्पाच्या अडचणी दूर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गोसे प्रकल्पात प्रस्तावित जलपर्यटनाचे सादरीकरण आपण आज पाहिले असून ते अप्रतिम आहे. या जलपर्यटनातून विकासाला चालना मिळेल. येत्या दोन वर्षात गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होणार असून भंडारा जिल्हा सुजलाम सुफलाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

भंडारा जिल्ह्यात नवनवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. गोड्या पाण्यातील मासेमारीला प्राधान्य दिले जाईल. ब्रॉडगेज मेट्रो भंडारापर्यंत सुरू होणार असल्याने भंडाऱ्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. समृद्धी महामार्गसुद्धा भंडारापर्यंत येणार आहे. बेरोजगारांना उद्योग निर्माण करण्यासाठी ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. कोणत्याही विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार डॉ. परिणय फुके, खासदार कृपाल तुमाणे, आमदार आशिष जयस्वाल, आमदार विजय रहांगडाले, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार अनिल बावनकर आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news