J. P. Nadda : देशाची ओळख विकसित राष्ट्र म्हणून होतेय : जे. पी. नड्डा

J. P. Nadda : देशाची ओळख विकसित राष्ट्र म्हणून होतेय : जे. पी. नड्डा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तरुण पिढीने आपली विकसित देशाची ओळख जपण्यासाठी योगदान द्यावे. भारत यापूर्वी विकसनशील देश म्हणून ओळखला जायचा. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेले ऐतिहासिक निर्णय आणि विकासकामांमुळे देशाची आता विकसनशील नव्हे, तर विकसित राष्ट्र म्हणून ओळख होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.

'मेरी माटी मेरा देश' अभियानाअंतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) महाराष्ट्र आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या वतीने राज्यभरातील 22 विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांनी आणलेले अमृतकलश नड्डा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, अभियानाचे प्रदेश संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, वीरपत्नी साधना ओझरकर आदी उपस्थित होते.

नड्डा म्हणाले, की ऑटोमोबाईल क्षेत्रात भारताने जपानला मागे टाकले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत वेगाने प्रगती करणारे राष्ट्र म्हणून नावारूपाला येत आहे. मेरी 'माटी मेरा देश' हा उपक्रम देशाला अखंड आणि एकत्र करणारा आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, की 'मेरी माटी मेरा देश' या उपक्रमातून 2 कोटी सेल्फी अपलोड करण्याचा विक्रम करण्याचा राज्याचा प्रयत्न सुरू आहे. यापैकी 50 लाखांचे टार्गेट उच्च शिक्षण विभागाने घेतले आहे.

'चंद्रयानासाठी शास्त्रज्ञांना पाठबळ'

चंद्रयान 3 मोहीम यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केंद्र सरकारने केले. मोदींनी शास्त्रज्ञांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. देशाच्या संसदेत महिला आरक्षणाचे ऐतिहासिक विधेयक मंजूर झाले. हे विधेयक 27 वर्षांपासून प्रलंबित होते. केंद्र सरकारने दोन दिवसांत विधेयक मंजूर करून घेतले, असे नड्डा यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news