मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी राज्य सरकारच्या वतीने ॲड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत नार्वेकर बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांना १६४ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजन साळवी यांना १०७ मते मिळाली.
दरम्यान, या निवडणुकीत त्यांनाच मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित १६ आमदारांना देखील लागू असेल, असे व्हीपमध्ये म्हटले होते. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करून शिवसेनेचा व्हिप पाळला नाही.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवाजी मतदानानंतर शिरगणती मतदान सुरू आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अध्यक्षपद निवडणुकीची घोषणा केली. तेव्हा आवाजी मतदान झाले. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी शिरगणती मतदानाचे आदेश दिले. त्यानंतर दहा मिनिटांचा वेळ देवून सभागृहाचे दरवाजे बंद केले. त्यानंतर आमदारांची शिरगणती मतदान सुरू झाले.
यावेळी शिवसेनेच्या प्रतोद सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हरकतीचा मुद्दा उपस्थित करता येत नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांचा मुद्दा उपाध्यक्ष झिरवळ यांनी योग्य असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचलंत का?