पुणे : पुढारी वृत्तसेवा; 'पुणे विमानतळावर सैन्यदलासाठी एक स्वतंत्र विश्रामकक्ष विमानतळ प्रशासनाने उपलब्ध करून द्यावा,' अशी मागणी विमान वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे. पुणे विमानतळावर सध्या विमानतळ विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम आता निम्म्यापेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. याच नव्याने होत असलेल्या विस्तारीकरणात सैन्यदलासाठी एक स्वतंत्र लाउंज असावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या विमानतळावर प्रवासी आणि व्हीआयपी लोकांसाठी लाउंज उपलब्ध आहे. त्याचा वापर प्रवाशांकडून केला जातो. याच लाउंजप्रमाणे सैन्यदलासाठीही स्वतंत्र लाउंज द्यावा, अशी मागणी वंडेकर यांनी विविध स्तरांवर केली आहे.
लाउंजमध्ये काय असते…
मग ते कोणत्याही विमान कंपनीसोबत उड्डाण करीत असले, तरी प्रवाशांना त्याचा फायदा मिळतो. कनेक्टेड फ्लाइट, रद्द केलेली फ्लाइट, पहाटे चेकइन किंवा न्याहारीसाठी विमानतळावरील लाउंज हा सर्वोत्तम पर्याय आहे. विश्रामगृह, आरामदायी आसने, मोफत स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक्स लाउंजमध्ये उपलब्ध आहेत.
सैन्यदलाचे अधिकारी, जवानांना रात्रंदिवस कधीही पुणे विमानतळावरून बाहेरगावी जावे लागते. त्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र लाउंज असावा, अशी मागणी गेल्या सात-आठ वर्षांपासून मी करीत आहे. खासदारांपासून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांना देखील ही मागणी केली आहे. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. आतातरी शासनाने विमानतळाच्या विस्तारीकरणात सैन्यदलाचा विचार करून स्वतंत्र लाउंज उपलब्ध करून द्यावा.
– धैर्यशील वंडेकर, विमान वाहतूकतज्ज्ञ, पुणे