महाराष्ट्राचा चित्ररथ ‘साडेतीन शक्तीपीठे’ साकारणारे शिल्पकार यशवंत व सहकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान

महाराष्ट्राचा चित्ररथ ‘साडेतीन शक्तीपीठे’ साकारणारे शिल्पकार यशवंत व सहकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर २६ जानेवारीला झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती या थीमवरील चित्ररथाचा देशातून दुसरा क्रमांक आला. विशेष म्हणजे या चलचित्र देखाव्यावरील संपूर्ण शिल्प विदर्भातील कलावंतांनी अर्थात यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील यशवंत एकनाथ एनगुर्तीवार यांनी तयार केली. त्यामुळे पाटणबोरीचे नाव राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरले गेले.

मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या कौतुक सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते यशवंत आणि सर्व सहकाऱ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कौतुक सोहळ्यात शिल्पकार यशवंतसह कला दिग्दर्शक तुषार प्रधान,सहाय्यक कला दिग्दर्शक रोशन इंगोले, श्रीपाद भोंगाडे,कृष्णा सालवटकर आदींना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावर्षी महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर व वणी सप्तश्रृंगी येथील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन चित्ररथाद्वारे पथसंचलनात लक्षवेधी ठरले. त्यासाठी साडेतीन शक्तीपीठ वरील देवी व अन्य शिल्प साकारण्यात आली होती.या चलचित्र देखाव्यासाठी साकारण्यात आलेली सर्व शिल्पे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात असलेल्या पाटणबोरी येथील यशवंत एनगुर्तीवार या शिल्पकाराने साकारली.

प्रजासत्ताक दिनाच्या या चित्ररथामध्ये साडेतीन शक्तीपीठाशिवाय देवीसमोर गोंधळ करणारे गोंधळी ज्यामध्ये पोतराज, हलगीवाला, जोगवा मागणारे, व इतर दहा शिल्प साकारली गेली. बहुतांश शिल्पांची उंची सहा ते नऊ फुटांपर्यंत आणि विशिष्ट फायबरपासून ही शिल्प तयार करण्यात आली. अल्पकालावधीत म्हणजे केवळ दहा दिवसांच्या अंतरात ही सर्व शिल्प साकारण्यात आली होती. याकरिता नीरज, पिंटू ,निखिल,सुरज अरुण ,अक्षय, अविनाश ,आकाश, ओम सांबजवार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

२०१६ मध्ये कर्नाटक येथील झाकी, २०१७ मध्ये महाराष्ट्रातील झाकी ज्यामध्ये गणेशोत्सवाची स्थापना करणारे लोकमान्य टिळक यांचे शिल्प आणि आता २०२३ मध्ये महाराष्ट्रातील नारीशक्ती या थीमवर आधारित साडेतीन शक्तीपीठाचे चलचित्र व उत्तर प्रदेशातील अयोध्या दीपोत्सव यात कुबेराच्या विमानात विराजमान असलेले राम, लक्ष्मण, सीता यांचे चलचित्र यशवंतच्या हातून साकारले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही चित्ररथांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. शुभ ऍड्स कंपनी नागपूरचे बीभिषान चावरे ,नरेश चरडे, यांच्या मार्गदर्शनात हा संपूर्ण देखावा तयार करण्यात आला.आर्ट डिरेक्टर तुषार प्रधान, व सहाय्यक रोशन इंगोले, श्रीपाद भोंगाडे, नंदकिशोर सालवंतकर यांनी चित्राची थीम तयार केली होती.

          हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news