तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील इंदोरी जवळील कुंडमळा हे निसर्गरम्य ठिकाण असून पर्यटन, वर्षा विहार करण्यासाठी पर्यटकांची तेथे गर्दी होत असते. अशावेळी तेथे जिवीतहानी होवू नये यासाठी पोलिसांनी धोक्याची जाणीव करुन देणारे फलक लावले असताना सुध्दा पर्यटक अतिउत्साहाच्या भरात जीव गमावत आहेत. शुक्रवारी (दि.०७) ओमकार बाळासाहेब गायकवाड (वय२४, मुळगाव पारनेर,जि.अहमदनगर) या मुलाचा पाण्याच्या प्रवाहात वाहत जावून मृत्यू झाला.
पिंपरी येथे टाटा मोटर मध्ये तो कामाला होता. तो कुंडमळा येथे पर्यटनाला आला होता. अतिउत्साहात धोक्याच्या ठिकाणी गेला असता सायंकाळच्या सुमारास पाय घसरुन पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. ही घटना समजल्यानंतर पोलीस वन्यजीव रक्षक मावळ आपदा मित्र मंडळ टीमने पाहणी करुन मृतदेह बाहेर काढण्याबाबत नियोजन केले. त्यानुसार रविवारी (दि.०९) दुपारचे सुमारास वन्यजीव रक्षक,मावळ आपदा मित्रमंडळ टीमचे निलेश गराडे, सुनील गायकवाड, शुभम काकडे, जिगर सोळंकी, अनिल आंद्रे आदींनी अथक प्रयत्न करुन मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. अशा अप्रिय घटना वारंवार घडत असताना सुध्दा धोक्याच्या सुचना फलकाकडे दुर्लक्ष करुन अनेक पर्यटक धोका पत्करुन पाण्यात उतरत आहेत. यामध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. अप्रिय घटना घडू नये याबाबत प्रशासनाचे प्रयत्न असतातच पालकांनीही जागृत राहणे आवश्यक आहे.
हे ही वाचा :