Lok Sabha elections 2024 : भाजप प. बंगालमध्‍ये मुसंडी मारणार! : प्रशांत किशोर असं का म्‍हणाले?

ममता बॅनर्जी, प्रशांत किशाेर, पंतप्रधान नरेंद्र माेदी. ( संग्रहित छायाचित्र)
ममता बॅनर्जी, प्रशांत किशाेर, पंतप्रधान नरेंद्र माेदी. ( संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या अधिकृत घोषणा झाली नसली तरी सर्वच राज्‍यांमध्‍ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. पश्‍चिम बंगालमध्‍ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप हा 'सामना' लक्षवेधी ठरला आहे. स्‍वबळावर निवडणूक लढविणार्‍या तृणमूलने राज्‍यातील ४२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता राज्‍यातील निवडणुकीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपला राज्‍यात मोठे यश मिळेल, असे भाकित केले आहे. जाणून घेवूया प्रशांत किशोर नेमकं काय म्‍हणाले?, काय आहे यामागील राजकीय रणनीती…

प. बंगालमधील धक्‍कादायक निकाल पाहण्‍यासाठी तयार राहा….

नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रख्‍यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्‍हणाले की, पश्चिम बंगालमध्ये भाजपला तृणमूल काँग्रेसपेक्षा मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. माझा अंदाज आहे की, भाजप बंगालमध्ये प्रत्येक बाबतीत तृणमूल काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालमध्‍ये भाजपच्या बाजूने लागणाऱ्या धक्कादायक निकाल पाहण्यासाठी तयार राहा. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. काही जण मला भाजपचे एजंट आहात, असा आरोप करतील;पण मी जर हे आज सांगितले नाही तर निवडणूक रणनीतीकार म्‍हणून व्यावसायिकदृष्ट्या मी स्‍वत:ला प्रामाणिक म्हणणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपसाठी परिस्थिती अनुकूल राहिलेली नाही. विधानसभा निवडणुका असो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसला आहे. पोटनिवडणुकीतही तृणमूल काँग्रेसने भाजपचा पराभव केला. भाजपचे सर्व वरिष्ठ नेते, अगदी मंत्रीही पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. तरीही प्रशांत किशोर कोणत्‍या आधारावर भाजपच्‍या विजयाचा दावा करत आहेत? , असा सवाल केला जात आहे. जाणून घेवूया भाजपने पश्‍चिम बंगालमध्‍ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आखलेली रणनीती.

Lok Sabha elections 2024 : 'तृणमूल'ला 'स्‍वबळा'चा फटका बसणार ?

'इंडिया' आघाडीपासून फारकत घेत तृणमूल काँग्रेसने राज्यात निवडणूक लढवणाऱ्या आपला प्रतिस्पर्धी भाजपला मजबूत होण्याची आणखी एक संधी दिली आहे, असे राज्‍यातील राजकीय विश्‍लेषक मानतात. तृणमूल विरोधातील सर्व मते ही भाजपला मिळणार आहेत. तसेच भाजपची हक्‍काचे मतदानही त्‍याच्‍याच वाट्याला येणार आहे. तृणमूलने स्‍वबळावर निवडणूक लढविताना काँग्रेसच्‍या भक्‍कम मतदारसंघातही जिंकण्‍यासाठी तयारी केली आहे. उदाहरणार्थ तृणमूल काँग्रेसने क्रिकेटपटू युसूफ पठाण याला काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात उभे केले आहे. अशा प्रकारे झालेल्‍या मतांच्‍या विभागणीचा भाजपला फायदा होवू शकतो, असे मानले जात आहे.

अनंत महाराजांना राज्यसभेवर पाठवण्याचे राजकीय 'गणित'

पश्‍चिम बंगालमधील अनंत राय हे राजबंशी समाजातील नेते आहेत. मतुआ नंतर, हा पश्चिम बंगालमधील दुसरा सर्वात मोठा अनुसूचित जाती (SC) समुदाय आहे. अनंत राय यांना उमेदवार करून भाजपने उत्तर बंगालमध्ये चांगली पकड मिळवली आहे. कारण राजबंशी समाजाचा तेथे मोठा प्रभाव आहे. उत्तर बंगालमध्ये लोकसभेच्या आठपैकी चार जागा राजवंशींनी जिंकल्या आहेत. 2019 मध्ये भाजपने यापैकी सात जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपला आठही जागा जिंकता येतील, असे राजकीय विश्‍लेषक अंदाज व्‍यक्‍त करत आहेत.

'सीएए' अंमलबाजवणीचा भाजपला मिळणार फायदा

नागरिकत्‍व सुधारणा कायदा (सीएए) अंमलबजावणीचे पश्‍चिम बंगालमध्‍ये भाजपला फायदा होवू शकतो, असे मानले जात आहे. 'सीएए'चा सर्वाधिक फायदा बंगालमधील 'मतुआ' समुदायाला होणार आहे. पश्‍चिम बंगाल राज्‍यात १ कोटी ८० लाख या समाजाचे मतदार आहेत. राज्‍यातील नादिया, उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांतील लोकसभेच्या किमान चार जागांवर या समुदायाच्‍या मतदानाचा प्रभाव आहे. मतुआ समाजाप्रमाणेच राजवंशी समाजालाही CAA चा लाभ मिळणार आहे. या समाजाचे लोकही 1971 पासून भारतीय नागरिकत्वाच्‍या प्रतिक्षेत आहेत. राम मंदिराच्या मुद्द्याचा भाजपला फायदा झाला आहे आणि यावेळीही पश्चिम बंगालसह देशभरातील हिंदूंना एकत्र करण्यात मदत होईल. CAA मुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण आणखी वाढण्याची अपेक्षा राजकीय विश्‍लेषक व्‍यक्‍त करत आहेत.

संदेशखाली प्रकरणाचा सिंगूर-नंदीग्राम प्रमाणे होवू शकतो परिणाम

पश्‍चिम बंगालमधील संदेशखाली लैंगिक अत्‍याचार व जमीन हडप प्रकरण हे बहूचर्चित ठरले. भाजपने याविरोधात राज्‍यभरात रान उठवले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचे दौर्‍यात यावर भाष्‍य केले. २०११ निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसने ज्‍या प्रकारे सिंगूर आणि नंदीग्राममधील आंदोलनाचे चळवळीत रूपांतरित केले होते. असेच काहीसे संदेशखालीमधील अत्‍याचार प्रकरणाला भाजपने हवा दिली आहे. पक्षाने 'द बिग रिव्हल – द संदेशखळी शॉकर' नावाचा माहितीपटही प्रसिद्ध केला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला नंदीग्राममधील जबरदस्ती भूसंपादन विरोधी आंदोलनाच्या मदतीने सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला होता . नंदीग्रामचे भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी म्‍हटलं आहे की, "संदेशखालीमधील परिस्थिती नंदीग्रामसारखीच आहे. नंदीग्राममध्ये लोकांनी जमीन संपादनाच्या विरोधात लढा दिला होता आणि येथे ते जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करण्याच्या विरोधात लढा देत आहेत." यावरुन आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पश्‍चिम बंगालमध्‍ये संदेशखाली प्रकरणाचा राजकीय हत्‍यार म्‍हणून वापर करुन घेवू शकते.

Lok Sabha elections 2024 : भाजप नेते ममता बॅनर्जींवर वैयक्तिक टीका टाळतायत

२०२१ मध्‍ये पश्‍चिम बंगालमध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींना 'दीदी ओ दीदी…' असे संबोधले. भाजपला या वैयक्तिक हल्ल्याचा फटका बसला. तृणमूलने पंतप्रधान मोदींनी मानवतेचा अपमान केला, असा प्रचार केला. याचा फायदा ममता बॅनर्जी यांना झाला. त्‍यामुळेच मागील काही दिवसांपासून पश्‍चिम बंगालमध्‍ये भाजपने आपली रणनीती बदलली आहे. पक्षाचा एकही नेता ममता बॅनर्जी यांच्‍यावर वैयक्तिक टीका करत नाही. मात्र सर्वच चुकांना तृणमूल काँग्रेस पक्षाला जबाबदार धरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सर्व जाहीर सभांमध्‍ये ममता बॅनर्जी यांच्‍यावर सावधपणे बोलताना दिसतात. भाजपचे नेत्‍यांनीही ममता बॅनर्जी यांच्‍यावरील उपहासात्मक विनोद आणि संवेदनशील आरोप करणे टाळत आहेत.

भाजपला 'राजकीय' निर्णयांची मिळणार सहानभूती

पश्‍चिम बंगालमधील अनुसूचित जातीतील राजवंशी, मातुआ आणि बौडींची लोकसंख्येच्या सुमारे 23 टक्के इतकी आहे. 2019 मध्ये चहा कामगार आणि जंगलमहालच्या आदिवासींनी भाजपला पाठबळ दिले हाेते.  CAA अंतर्गत मतुआ आणि राजवंशींना मिळणाऱ्या फायद्यांचा इतर अनुसूचित जातींवरही भावनिक प्रभाव पडेल, असे मानले जात आहे. अनंत महाराजांना राज्यसभेवर पाठवणे, राजबंशी समाजाचे नेते आणि भाजपचे विद्यमान लोकसभा खासदार निशीथ प्रामाणिक यांना मंत्री करणे आदी निर्णयामुळे भाजपला लाेकसभा निवडणुकीत फायदा हाेईल असे मानले जात आहे.

एकूणच पश्‍चिम . बंगालमधील धक्‍कादायक निकाल पाहण्‍यासाठी तयार राहा, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितले असले तरी यासाठी काही महिन्‍यांची वाट पाहावी लागणार आहे. ऐन निवडणूक काळात बदलणार्‍या चित्रामुळेही निकालावर परिणाम होताे, असा पश्‍चिम बंगालमधील मागील निवडणुकीचा अनुभव सर्वांनाच आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news