पुढारी ऑनलाईन : आमच्यावर आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवणे भाजपच्या नेत्यांनी आता थांबवले पाहिजे. आमच्या प्रश्नांना केंद्र सरकारला उत्तर देता न आल्यानेच मला तब्बल १०२ दिवस तुरूंगात डांबले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आंबेडकर, पवार आणि ठाकरेंची महाराष्ट्रात मोठी ताकद आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही महाराष्ट्रातील ताकदीची नावे आहेत. त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांवर शिंदे गटातील आणि भाजपमधील नेत्यांनी आमच्यावर टीका करून प्रसिद्धी मिळवणे आता थांबवले पाहिजे, असाही सल्ला त्यांनी सत्तेतील पक्षाच्या नेत्यांना दिला.
हवेचे पोकळ बुडबुडे सध्या हळूहळू फुटायला लागलेत. कारण लोक मोठ्या प्रमाणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात पक्षप्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर सगळ्यांचाच विश्वास आहे. त्यामुळे आमची शिवसेना पुन्हा ताकदीने उसळी घेईल; असा विश्वास ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
ईडीच्या कोठडीतून सुटका झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील त्यांनी भेट घेतली. त्यानंतर लगेचच खासदार संजय राऊत ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून आले. आज पुन्हा राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान दोघांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आणि यावेळी महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचेही समजत आहे.