चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा सावली तालुक्यातील व्याहाड उपवनक्षेत्रातील सामदा भागात एका व्यक्तीचा बळी घेणाऱ्या तीन वर्षांच्या वाघाला आज (बुधवार) सकाळी बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. त्यामुळे या परिसरात नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. जेरबंद वाघाला ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.
या विषयी वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रातील सामदा भागात गेल्या पंधरा दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला होता. या परिसरातील निलसनी पेटगाव येथील शेतकरी कैलास खेडेकर याला वाघाने ठार केले होते. त्यानंतरही वाघाचा या भागात धुमाकूळ सुरूच होता. नागरिकांच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेऊन 25 कर्मचाऱ्यांचा चमू या वाघावर पाळत ठेवून होता.
आज (बुधवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वाघ सामदा भागात भ्रमंती करताना आढळून आला. वनपरिक्षेत्राधिकारी विरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शार्प शूटरने वाघाला बेशुद्ध केले. त्यानंतर काही वेळाने सुरक्षितरित्या वाघाला जेरबंद करण्यात आले. यावेळी राऊंड ऑफिसर सूर्यवंशी, मेश्राम, कोडापे, पाटील यांची उपस्थिती होती. पशुवैद्यकीय अधिकारी बशैटी यांनी जेरबंद वाघाची तपासणी केल्यानंतर त्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. जेरबंद वाघाला ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून व्याहाड, सामदा भागात दहशतीत असलेल्या नागरिकांनी या वाघाला जेरबंद केल्याने सुटकेचा निःश्वास टाकला. सावली व मूल तालूका लागून आहेत. दोन्ही तालुक्यात वाघांनी प्रचंड दहशत माजविली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा :