जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोरी (ता. इंदापूर) येथील शेतकर्यांनी द्राक्षबागेसाठी वापरलेले रासायनिक खत भेसळयुक्त असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती इंदापूर पंचायत समितीचे गुणनियंत्रण निरीक्षक राजेंद्र काळे यांनी दिली. सल्फेट ऑफ पोटॅश (एसओपी) मध्ये तणनाशकाची भेसळ तसेच पोटॅशचे प्रमाण कमी आढळले असून, संबधित कंपनी व दुकानदारावर कारवाई करणार असल्याची माहिती काळे यांनी दिली. बोरी गावातील द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी वापरलेल्या भेसळयुक्त सल्फेट ऑफ पोटॅश या रासायनिक खतामध्ये 2-4 डी या तणनाशकाचे प्रमाण 5.96 टक्के आढळले तसेच खतामध्ये 50 टक्के पोटॅश असणे गरजेचे होते. मात्र, 50 टक्क्यांऐवजी फक्त 6 टक्के पोटॅश आढळून आल्यामुळे बोरी गावातील शेतकर्यांची फसवणूक झाल्याची माहिती राजेंद्र काळे यांनी दिली.
संबंधित बातम्या :
बोरीमधील सुमारे 50 शेतकर्यांनी द्राक्षबागांच्या वाढीसाठी तसेच द्राक्षाचे मणी फुगवणीसाठी गावातील दुकानदाराकडून सल्फेट ऑफ पोटॅश (एसओपी) रासायनिक खताची खरेदी करून द्राक्षबागेसाठी वापरले होते. या खताची निर्मिती बारामती एमआयडीसीतील एका लोकल कंपनीने केली होती. भेसळयुक्त खताच्या वापरामुळे द्राक्षाच्या झाडांच्या पानांची वाढ खुंटली असून, पाने करपू लागली आहेत. भेसळयुक्त खतातुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांचा चालू वर्षीचा सुमारे 100 एकरामधील हंगाम वाया गेला असून, शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
भेसळयुक्त खताच्या प्रकारानंतर इंदापूरचे कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर व पंचायत समितीचे गुणनियंत्रण निरीक्षक राजेंद्र काळे यांनी तातडीने द्राक्षबागांची पाहणी करून एसओपी खताचे नमुने घेऊन तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेमध्ये पाठविले होते. या रासायनिक खतामध्ये भेसळ आढळली आहे. तसेच सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये पोटॅशचे प्रमाण अंत्यत कमी आढळले आहे. कृषी विभागाने संबंधित कंपनी व दुकानदाराला नोटीस दिली असून, कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे गुणनियंत्रण निरीक्षक राजेंद्र काळे यांनी दिली.