पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचा (ठाकरे गट) दसरा मेळावा मंगळवार २४ ऑक्टाेबर राेजी शिवाजी पार्कवर झाला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जाेरदार टीका केली. आता या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाउंटवरुन पोस्ट करत म्हटलं आहे की, "उध्दव ठाकरे नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत, खरं तर ती त्यांची पात्रता नाही." (Thackeray vs Bawankule)
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'X' अकाउंटवरुन पोस्ट करत प्रत्यूत्तर दिले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. खरं तर हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना 'इंडिया' आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत. नरेंद्र मोदीजींचे कर्तृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं आहे; पण उध्दव ठाकरे त्यांच्यावर टीका करत आहेत. खरं तर ती त्यांची पात्रता नाही. संपूर्ण देश मोदीजींचं कुटुंब आहे पण 'माझं कुटुंब- माझी जबाबदारी' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते कळणार नाही.
उध्दव ठाकरे शिवतीर्थावर बोलताना हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबद्दल बोलतील असं वाटलं होतं पण ते मूग गिळून गप्प बसले. कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केल्याबद्दल ते आज तरूणांची माफी मागतील, असं वाटलं पण त्यांना महाराष्ट्रातील तरूणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता वाटत आहे."
हेही वाचा