पुढारी ऑनलाईन डेस्क: आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज (दि. २२) जाहीर झाली. यानंतर भाजपच्या शिस्तपालन समितीने तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांचे निलंबन मागे घेतले आहे. या संदर्भातील माहिती भाजपने त्यांच्या अधिकृत X सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत शेअर केली आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली ऑगस्ट 2022 मध्ये आमदार टी राजा सिंह यांना अटक झाली हाेती. यानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना पहिल्या उमेदवारी यादीत स्थान देत, त्यांचे निलंबन रद्द केले आहे.
तेलंगणातील आमदार राजा सिंह यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी घेण्यात आला. भाजपने याआधी निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तेलंगणात भाजपने सत्ताधारी बीआरएस पक्षाला टक्कर देण्याची जोरदार तयारी केली आहे.
पक्षाच्या या निर्णयानंतर आमदार राजा सिंह यांनी संघटना सर्वोपरी !! म्हटले आहे. तसेच पक्षाने निलंबन मागे घेतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच भाज ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे आभार मानले आहेत. या संदर्भातील पक्षाचे पत्र आणि पोस्ट त्यांनी त्यांच्या वैयक्तिक X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केली आहे.