पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दिमाखात सेमी फायनलमध्ये (उपांत्य फेरीत) प्रवेश केला आहे. या स्पर्धेत संघातील प्रत्येक खेळाडूने आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. ( Team India T20WC ) सामन्यावेळीही संघातील एकजुटता मैदानात दिसली आहे. संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली यांचेही मोलाचे योगदान असल्याचे नव्या माहितीमुळे स्पष्ट झाले आहे.
'द इंडियन एक्सप्रेस दैनिका'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाजांच्या पायाला विश्रांती मिळावी म्हणून त्यांना विमानातील बिझनेस क्लासच्या सीट देण्यात आल्या. याचा निर्णय आम्ही विश्वचषक स्पर्धेपूर्वीच घेतला होता. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली यांनी आपली बिझनेस क्लासमधील सीट ही संघातील वेगवान गाोलंदाज मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांना दिल्या, अशी माहिती टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने ॲडलेडमध्ये संघाचे आगमन झाल्यानंतर दिली. वेगवान गोलंदाजांच्या पायाला पुरेसा आराम मिळावा म्हणून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांनुसार, प्रत्येक संघाला हवाई प्रवासावेळी चार बिझनेस-क्लास जागा मिळतात. बहुतेक संघ त्यांचे प्रशिक्षक, कर्णधार, उपकर्णधार आणि व्यवस्थापक यांनाही सुविधा देतात. मात्र विश्वचषक स्पर्धेतील हवाई प्रवासाचा विचार करता भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाजांच्या पायाला आराम मिळावा यासाठी त्यांना बिझनेस-क्लासची जागा देण्याचा निर्णय झाला. या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सुमारे 34,000 किमीमीटर हवाई प्रवास केला आहे.
फिजिओ आणि प्रशिक्षक वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांना प्रवासात त्रास होवू नये, पुरेशी झोप आणि विश्रांती मिळावी याची काळजी घेतली जात असल्याचेही सपोर्ट स्टाफमधील सदस्याने स्पष्ट केले.
हेही वाचा :