Team India in Trouble : टीम इंडिया अडचणीत! 4थ्या-5व्या नंबरसह ‘सलामी’ जोडीने वाढवली डोकेदुखी

Team India in Trouble : टीम इंडिया अडचणीत! 4थ्या-5व्या नंबरसह ‘सलामी’ जोडीने वाढवली डोकेदुखी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India in Trouble : आशिया कप सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. तर विश्वचषक स्पर्धेचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया अजूनही सलामीच्या जोडीवरून संभ्रमात असल्याचे चित्र आहे. रोहित शर्मा (Rohit Shrma), शुभमन गिल (Shubman Gill) आणि इशान किशनमध्ये (Ishan Kishan) चुरस दिसून येत आहे. पण हे निश्चित आहे की, आशिया कपमध्ये (Asia Cup) जे दोघे खेळाडू डावाची सुरुवात करतील तेच अगामी विश्वचषक स्पर्धेत अव्वल 2 स्थानांवर खेळताना दिसतील. चला तर या तीन खेळाडूंची ताकद आणि कमकुवपणावर चर्चा करूया.

सलामी जोडीवरून टीम इंडियासमोर संकट? (Team India in Trouble)

काही दिवसांपूर्वी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? पाचव्या क्रमांकावर कोण खेळणार? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. या दोन बॅटिंग पोझिशन सोबत आता सलामी जोडीनेही टीम इंडियासमोर संकट उभे केले आहे. विंडीज दौऱ्यात रोहित शर्माला विश्रांती दिल्यानंतर ईशान किशन गिलसोबत मैदानात उतरून चमकदार सलामी दिली. ही आश्वासक कामगिरी इशानला आशिया कप आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत सलामीवीर म्हणून संधी देईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर खरेच असे झाले तर संघ व्यवस्थापन हिटमॅन रोहित आणि शुभमन गिल यांच्यापैकी कुणाचा बळी देईल, हेही पाहण्यासारखे आहे.

रोहितचा 'कहर'-गिलही 'सुपरहिट', मग…

रोहित किंवा शुबमन किंवा ईशान यांच्यापैकी एकला ओपनिंग जोडीतून वगळावेच लागणार आहे. तर मग वगळल्या गेलेल्या त्या खेळाडूचे नवे स्थान काय असेल? असा सवालही उपस्थित होत आहे. रोहित शर्मा गेल्या काही वर्षांत सलामीवीर म्हणून कसा कहर करतोय हे कोणापासून लपून राहिलेले नाही. तर गिलही डावाची सुरुवात करताना सुपरहिट ठरला आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहितने (Rohit Sharma) एक गोष्ट स्पष्ट केली. तो म्हणाला की, फलंदाजांना लवचिक असायला हवे, कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीस त्यांनी सज्ज असायला हवे.' पण दुसऱ्याच क्षणी तो असेही म्हणाला की, खालच्या फळीतील फलंदाजाला सलामीला पाठवण्याची त्याची कोणतीही योजना नाही. (Team India in Trouble)

इतिहासात डोकावणे गरजेचे

सलामी जोडीवरून निर्माण झालेल्या प्रश्नाच्या पार्श्‍वभूमीवर थोडे इतिहासात डोकावणे गरजेचे आहे. यात 2019 च्या विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची सलामीवीर म्हणून कामगिरी कशी राहिली याची चर्चा करावी लागेल.

सलामीवीर म्हणून रोहितला पहिली पसंती

आशिया कपमध्ये (Asia Cup) सलामीवीर म्हणून रोहित शर्माला (Rohit Sharma) पहिली पसंती असेल. आशिया कपनंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळायची आहे. त्यानंतर 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. 2019 च्या विश्वचषकात रोहितने 648 धावा केल्या, यादरम्याने त्याच्या बॅटमधून 5 शतके झळकली. रोहित कोणत्याही एका वनडे विश्वचषकात 5 शतके झळकावणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. हिटमॅनने 2019 विश्वचषकानंतर सलामीवीर म्हणून 27 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 44.64 च्या सरासरीने 1116 धावा वसूल केल्या आहेत. म्हणजे सलामीवीर म्हणून त्याचे खेळणे निश्चित असेल, पण त्याच्या जोडीदार कोण असा प्रश्न आहे.

रोहित शर्माची कमजोरी

2013 ते 2020 दरम्यान, रोहितची वनडे सामन्यांची सरासरी 50 पेक्षा जास्त होती, परंतु गेल्या तीन वर्षांत त्यात मोठी घट झाली आहे. ही रोहितसाठी चिंतेची बाब आहे. अशातच त्याची डावखु-या वेगवान गोलंदाजा विरुद्ध खेळताना भांबेरी उडते, हेही तितकेच खरे आहे. (Team India in Trouble)

सलामीवीर म्हणून गिलचीचे वादळी रेकॉर्ड

शुभमन गिलने (Shubman Gill) 31 जानेवारी 2019 रोजी हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध वनडे पदार्पण केले. त्या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळला. पण सलामीवीर म्हणून त्याचे रेकॉर्ड वादळी आहे. गिलने 23 सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून हजेरी लावली आहे, ज्या दरम्यान त्याने 103.28 च्या स्ट्राइक-रेटने आणि 66.21 च्या सरासरीने 1258 धावा केल्या आहेत.

गिलची कमजोरी

आयपीएलनंतर गिल (Shubman Gill) बॅकफुटवर गेला आहे. अलीकडचा त्याचा फॉर्म डळमळीत झाला आहे. तो चमकदार फलंदाजी करण्यात अपयशी ठरला आहे. डावाच्या सुरुवातीला ऑफ-साइड चेंडूंवर खेळणे त्याच्या दिर्घ खेळीत अडथळा निर्माण करत आहेत. याबाबींमुळे गिलच्या अडचणीत वाढत होत आहे.

सलामीवीर म्हणून इशानचा दावा किती भक्कम?

अलीकडच्या काळात ईशान किशनही (Ishan Kishan) टीम इंडियात सलामीवीर म्हणून आपली जागा पक्की करता दिसत आहे. त्याने 6 सामन्यात 70.83 च्या सरासरीने आणि सलामीवीर म्हणून 125 च्या स्ट्राईक रेटने 425 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने विक्रमी द्विशतकी खेळी साकारली आहे. ईशानने सलामीवीर एकूण 17 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून 694 धावा आल्या आहेत. अलीकडेच, विंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 184 धावा फटकावणा-या या डावखु-या फलंदाजाला 'प्लेअर ऑफ द सीरीज'ने गौरवण्यात आले आहे.

ईशान किशनची कमजोरी

शॉर्ट बॉलचा सामना करणे ही ईशानची (Ishan Kishan) कमजोरी आहे, अशा परिस्थितीत तो त्याच्यावर कसा मात करतो. हा प्रश्न कायम राहील.

चौथ्या-पाचव्या स्थानाची डोकेदुखी

आशिया कप आणि विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी सर्वात मोठी डोकेदुखी सध्या नंबर 4 आणि नंबर 5 आहे. टीम इंडियाने 2019 विश्वचषकानंतर चौथ्या क्रमांकावर आणि पाचव्या क्रमांकावर 14 खेळाडूंना आजमावले आहे.

चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर सर्वाधिक यशस्वी

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 2019 च्या विश्वचषकानंतर चौथ्या क्रमांकावरील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. यानंतर या यादीत ऋषभ पंतचा नंबर आहे, जो गेल्या वर्षीच्या अपघातानंतर टीम इंडियातून बाहेर पडला आहे. पंतने 11 सामन्यांत चौथ्या क्रमांकावर 36 च्या सरासरीने आणि 100.55 च्या स्ट्राइक रेटने 358 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या यादीत केएल राहुलचेही नाव आहे. तसेच, टी-20 मध्ये शानदार कामगिरी करणा-या तिलक वर्मानेही या स्थानावर दावा ठोकला आहे.

2019 विश्वचषकानंतर वनडेतील चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांचे रेकॉर्ड

केएल राहुल : सामने 4, धावा 189, सरासरी 63, स्ट्राईक रेट 89, शतक 1, अर्धशतक 1.
सूर्यकुमार यादव : सामने 6, धावा 30, सरासरी 6.00, स्ट्राईक रेट 100.
श्रेयस अय्यर : 22 सामने, 805 धावा, 47.35 सरासरी, स्ट्राईक रेट 94.37, शतके 2, अर्धशतके 5.
संजू सॅमसन : 1 सामना, 51 धावा, सरासरी 51.00, स्ट्राईक रेट 124.39, अर्धशतक 1
इशान किशन : सामने 6, धावा 106, सरासरी 21.20, स्ट्राईक रेट 67.08, अर्धशतक 1

केएल राहुल पाचव्या क्रमांकावर यशस्वी

2019 विश्वचषकानंतर, टीम इंडियासाठी पाचव्या क्रमांकावर 11 फलंदाज खेळले. पण यात केएल राहुल हा यशस्वी ठरला आहे. त्याच्याखालोखाल सूर्यकुमार यादवचा क्रमांकावर लागतो. त्याचबरोबर रवींद्र जडेजा, मनीष पांडे, अक्षर पटेल, केदार जाधव हे देखील 1-1 सामन्यात पाचव्या क्रमांकावर खेळले आहेत. पण त्यांना विशेष काही करता आलेले नाही.

2019 विश्वचषकानंतर वनडेत पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजांचे रेकॉर्ड

केएल राहुल : सामने 17, धावा 735, सरासरी 56.53, स्ट्राईक रेट 99.45, शतक 1, अर्धशतके 7.
सूर्यकुमार यादव : सामने 12 , धावा 320, सरासरी 35.55, स्ट्राईक रेट 98.46, अर्धशतके 2.
ऋषभ पंत : सामने 7, धावा 250, सरासरी 50.00, स्ट्राईक रेट 135.13, अर्धशतके 3.
श्रेयस अय्यर : सामने 7, धावा 244, सरासरी 34.85, स्ट्राईक रेट 110.90, अर्धशतके 3.
संजू सॅमसन : सामने 5, धावा 104, सरासरी 52.00, स्ट्राईक रेट 89.65, अर्धशतक 1.
हार्द‍िक पंड्या : सामने 2, धावा 77, सरासरी 77.00, स्ट्राईक रेट 116.66, अर्धशतक 1.
दीपक हुड्डा : सामने 3, धावा 26, सरासरी 13.00, स्ट्राईक रेट 66.66.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news