
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कमी बोल, तब्येतीची काळजी घे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहीण सरोज पाटील यांना दिला. सध्या आजारी असल्याने सरोज पाटील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
शरद पवार आपल्या दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्यावर होते. शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार होते. तेव्हा आपली बहीण आजारी असल्याचे समजले. तत्काळ पवार सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये गेले. पवार यांना पाहून सरोज पाटील यांनी तुला कोणी सांगितले मी अॅडमिट आहे ते अशी विचारणा केली. तेव्हा व्ही. बी. पाटील यांनी कोल्हापूर शहर लहान आहे लगेच समजते, असे सांगितले. यावर सरोज पाटील बिछान्यावरून उठल्या.
आपल्या रयत शिक्षण संस्थेत मेडिकलसंबंधी छोटे छोटे कोर्स सुरू करायचे आहेत. याची माहिती मी घेत आहे, आपण असे कोर्स सुरू करू. याचा ग्रामीण भागातील मुलांना लाभ होईल. या हॉस्पिटलमध्ये चांगली सोय आहे, पण माझे बिल घेत नाहीत, असे सरोज पाटील सांगत होत्या. तेव्हा किती बोलतेस, कमी बोल, तब्येतीची काळजी घे. तब्येत बरी झाली की मग विचार करू, असा सल्ला दिला. यावेळी डॉ. संजय देसाई, डॉ. संदीप पाटील यांनी सरोज पाटील यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत आ. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, उपस्थित होते. यानंतर त्यांनी व्ही. बी. पाटील यांच्या घरी भोजन घेतले. यावेळी शाहू महाराज, आ. जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. पी. एन. पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :