पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा! : नाना पटोले

नाना पटोले
नाना पटोले

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयए, ईडी या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड करताना पुण्यात काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणाऱ्या व दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणतीही संघटना धार्मिक उन्माद घालत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात दहशतवादी कारवायांना कसलेही स्थान मिळता कामा नये, राज्यात शांतता राहिली पाहिजे हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडायला नको आहेत. अशा प्रवृत्तींना राज्यातून ताकद मिळते काय ? हे तपासले पाहिजे. हिंदू- मुस्लीम वाद निर्माण करून कोणी आपली राजकीय पोळी भाजत आहे का ? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, त्या लोकांवर कडक कारवाई करा. परंतु UAPA कायद्यानुसार PFI सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत.

PFI वर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस पक्षाने याआधीही केली होती पण केंद्रातील भाजप सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या संघटेवर बंदी घालत नाही का? केंद्रात आठ वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आहे, या सरकारला पीएफआयच्या कारवायांची माहिती नव्हती का? केंद्र सरकार आजपर्यंत डोळे झाकून बसले होते का? असे सवालही पटोले यांनी उपस्थित केले. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते पण ईडी सरकारच्या काळात राज्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदारच गोळीबार करतो, त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत काय ?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रा सुरु झाल्यापासून देशातले वातावरण बदलले आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेची भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही दखल घ्यावी लागली म्हणून तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदीत जाऊन इमाम इलिसायी यांची भेट घेतली, त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागतच करतो.

कालपर्यंत राहुल गांधी यांच्यावर टीका करणारे बाबा रामदेव यांनीही भारत जोडो यात्रेची दखल घेत राहुल गांधी यांच्या भूमिकेचे स्वागत केले. हा बदल भारत जोडो पदयात्रेमुळे होत आहे. राहुल गांधी हाती तिरंगा घेऊन देश जोडायचे काम करत आहेत, सर्व धर्माला एकत्र घेऊनच देश जोडला जाऊ शकतो ही राहुल गांधी यांची भूमिका जर कोणाला पटत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. राहुल गांधी यांची भूमिका देशहिताची आहे आणि देशापेक्षा कोणी मोठा नाही.

महाराष्ट्रात भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबरला येत आहे. यावेळी ज्या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे त्या भागातील काँग्रेस कार्यकर्ते व लोक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतील व राहुल गांधी यांच्या देश जोडण्याच्या या महान कार्यात सहभागी होतील अशी आशा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news