उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात टोमणेच अधिक असणार : नरेश म्हस्के | पुढारी

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात टोमणेच अधिक असणार : नरेश म्हस्के

ठाणे : पुढारी वृत्तसेवा: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यालयालयाने उद्धव ठाकरे यांना सशर्त परवानगी दिल्यानंतर ठाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष केला. मात्र, या मुद्द्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर टीका केली. त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार नसतील, तर केवळ टोमणेच अधिक असतील, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. निर्णय त्यांच्या बाजूने लागला असला, तरी आमची न्यायालयील लढाई सुरु असून आम्ही कायद्याचा आदर करत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाची माहिती देण्यासाठी खा. श्रीकांत शिंदे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवाजी पार्क येथील दसरा मेळावा कोण घेणार असा वादंग निर्माण झाला होता. शिवसेनेच्या वतीने २२ ऑगस्ट रोजी शिवाजी पार्क येथील मैदानासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी देखील शिवाजी पार्क मैदानासाठी ३० ऑगस्ट रोजी अर्ज केला होता. अखेर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनाच कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे.

यावर म्हस्के म्हणाले की, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यासाठी शिवसैनिक हिंदुत्ववादी विचारांचे सोने लुटण्यासाठी येत होते. मात्र, आता त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार सोडून टोमणेच अधिक असणार आहे, असा टोला म्हस्के यांनी लगावला.

आनंद दिघेंच्या उत्सवाची परंपरा मुख्यमंत्र्यांनीच पुढे नेली : खा. श्रीकांत शिंदे

आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरु केलेल्या दहीहंडी उत्सवाबरोबरच नवरात्रोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात पोहोचवला. त्यांनी सुरु केलेली ही उत्सवाची परंपरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेली असल्याचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्यामुळेच नवरात्रौत्सवात स्वतः मुख्यमंत्रीही हजर राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button