पुढारी ऑनलाईन डेस्क : SL vs NED T20 World Cup : दासुन शनाकाच्या नेतृत्वाखाली खेळणा-या श्रीलंकेच्या संघाने गुरुवारी नेदरलँड्सचा 16 धावांनी पराभव करत टी 20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 मध्ये प्रवेश केला. या विश्वचषक स्पर्धेतील नेदरलँडचा हा पहिला पराभव असून आता या संघाची नजर आता नामिबिया विरुद्ध यूएई सामन्यावर असेल. जर यूएईने हा सामना जिंकला तर नेदरलँड्स सुपर-12 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनेल. पण जर त्या सामन्यात यूएई पराभूत झाल्यास नामिबियाचे सुपर-12 मध्ये स्थान निश्चित होईल.
विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत बोलायचे झाले तर या संघाला नामिबियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर पुढील दोन सामन्यांत आशिया कप विजेत्या संघाने प्रतिस्पर्धी संघांवर सहज मात केली. मात्र, सध्या श्रीलंका आणि नेदरलँड्स संघांचे प्रत्येकी 4 गुण आहेत. असे असले तरी चांगल्या नेट रनरेटमुळे श्रीलंका सुपर 12 मध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला असून त्यांना कोणत्या गटात प्रवेश मिळाला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नामिबिया विरुद्ध यूएई सामन्यानंतर हे चित्रही स्पष्ट होईल.
तत्पूर्वी, शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर कुसल मेंडिसच्या 79 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 162 धावांपर्यंत मजल मारली. 44 चेंडूंचा सामना करत मेंडिसने या डावात 5 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार ठोकले. त्याच्याशिवाय अस्लंकाने 31 धावांची खेळी खेळली.
163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघासाठी सलामीवीर मॅक्स ओडॉडने 71 धावांची नाबाद खेळी साकारली. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून इतर फलंदाजाची साथ मिळाली नाही आणि नेदरलँड्सचा संघ 20 षटकात 9 विकेट्स गमावू 146 धावांपर्यंत मजल मारू शकला. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने 3 आणि महिष तेक्षणाने 2 गडी बाद करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.