पुढारी; ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवचे कौतुक केले आहे. भारताला सेमी फायनलमध्ये मात करत इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. यानंतर सूर्यकुमार हा 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' असल्याचे जोस बटलर म्हणाला आहे. सूत्रसंचालक आणि जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने जोस बटलरशी संवाद साधला यावेळी तो बोलत होता. (T20 WC 2022)
बटलर म्हणाला, सूर्यकुमार यादव कोणत्याही दबावाखाली खेळला नाही. त्याने मुक्तपणे आपला खेळ दाखवला. त्याने मैदानाच्या चारीबाजूला फटकेबाजी केली. सूर्यकुमारने टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताकडून प्रभावशाली फलंदाजी केली. त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य होते. सूर्याकुमार यादवने या टी-२० विश्वचषकात १८९.६८ च्या स्ट्राईक रेट २३९ धावा केल्या. २३९ धावांसह विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. (T20 WC 2022)
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमधील मालिकावीर पुरस्कारासाठी आयसीसीने ९ खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. शुक्रवारी आयसीसीने ही ९ खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत भारताच्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची नावे देखील आहेत. दोघांनीही यंदाच्या टी- २० वर्ल्डकपमध्ये दमदार फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला होता. रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यानंतर या पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. (T20 WC 2022)