सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
कडक उन्हात घामाघूम झालेल्या पाहुणे मंडळींना ताटकळत ठेवून उशिराने लग्न लावणे हे फॅशनच होऊ पाहत आहे. याबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. १२.३५ चे लग्न पावणेदोनला लागते, मग लग्न मुहूर्त काढतात कशाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Summer Wedding)
नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाची तीव्रता जास्त आहे. पारा ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान असतो. मुहूर्त टळून जातो, लग्न उशिरा लागते, मग वरपिता आणि वरमाय या दोघा उभयतांची भेट घेऊन काही पाहणे उपस्थित असल्याची हजेरी नोंदवत अन मुहूर्त जास्त असल्याने पुढच्या लग्नासाठी गुपचूप काढता पाय घेतात, असेही प्रकर्षाने दिसून येत आहे.
सद्यस्थितीत सूर्यनारायण अक्षरशः आग ओकत आहे. अंगाची लाहीलाही होते. तरी नातेवाईक, आप्तमंडळी, सगेसोयरे कामधंदे सोडून लग्नाला हजेरी लावतात. (Summer Wedding) पण वरपिता-वधूपिता व नवरदेवाचे कलवरे यांना याचे काहीच सोयरसुतक नसते. येणाऱ्या पाहण्यांची काळजी नसेल तर अशा लग्रात थांबण्यात काय अर्थ? लोक काही फक्त जेवायला येत नाहीत, आनंदात सामील होण्यास येतात, वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. त्यामुळे या गोष्टीचा विचार होण्याची गरज सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे
तब्बल दीड ते दोन तास उशिराने लागतात लग्न
मुहूर्त काढलाच तर मग दोन पाच मिनिटे इकडे की तिकडे समजू शकतो. लग्नाला तब्बल दीड-दोन तास उशीर होत असेल तर संबंधितांना वेळेची कदर नाही, असे दिसते. त्यामुळे मुहर्ताचे पाखंड कशाला? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. मुहूर्त काढून पाळायचा नसेल तर हा ढोंगीपणाच म्हणावा लागेल, असेही एका नागरिकाने म्हटले आहे. लग्न हा आयुष्यातील एक अनमोल क्षण आहे, तसाच तो संस्कारदेखील आहे. हे वरपिता वधुपिता यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. उन्हातान्हात लग्नाला आलेल्या आप्तस्वकीयांचा विचार करून लग्न वेळेत लागतील, अशी अपेक्षा वन्हाडी मंडळी करीत आहेत.
आग्रहाचे निमंत्रण असल्याने लग्नाला न जाणे हे माणुसकीला धरून नसल्याने जेथे जाण्यासारखे आहे, तेथे जावे लागते. तो माणुसकी धर्माचा भाग आहे. पण, आमंत्रित पाहुणे रिकामटेकडे किंवा बिनकामाचे नसतात. हे संबंधितांनी ध्यानात घ्यायला हवे. – नामदेव कोतवाल, माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.
हेही वाचा: