Sugar Price : ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर झाली ‘कडू’; क्विंटलमागे पुन्हा दरवाढ

Sugar Price : ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर झाली ‘कडू’; क्विंटलमागे पुन्हा दरवाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर महिन्यांसाठी केंद्र सरकारने 25 लाख टनांचा साखरेचा मुबलक कोटा खुला करूनही सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे सणासुदीच्या तोंडावर साखरेचे दर वाढले आहेत. दोन दिवसांत साखरेचे दर क्विंटलला पुन्हा 75 रुपयांनी वाढून शनिवारी 3900 ते 3925 रुपयांवर पोहोचले आहेत. कारखान्यांकडून साखर विक्रीस हात आखडता घेतला जात असल्याने तेजीस हातभार लागत असल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली. केंद्राने सप्टेंबर महिन्यासाठी 25 लाख टनांचा मुबलक कोटा जाहीर केला आहे.

मात्र, मागील चार महिन्यांपासून साखरेच्या निविदा सातत्याने उंच जात असून, केवळ सटोडियांची सक्रियता हेच त्यामागे कारण सांगितले जात आहे. कारखाने ठरावीक दराला साखरेची खुली विक्री करत आहेत. तर दुसरीकडे सट्टेबाज दररोजच्या निविंदामध्येही 20 ते 25 रुपयांनी अधिक दर देऊन साखर खरेदीस प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सणासुदीत मुबलक कोट्यानंतरही साखरेचे दर तेजीत आहेत. राज्यातील बहुतांशी कारखान्यांच्या साखरेच्या निविदा क्विंटलला 3570 ते 3620 रुपये दराने जात आहेत.

तर एस 30 ग्रेड साखरेचा प्रति क्विंटलचा घाऊक दर 3900 ते 3925 रुपयांवर पोहोचले. तर किरकोळ बाजारात प्रति किलोचा दर 40 ते 41 रुपयांवर पोहोचल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. दरम्यान, काही कारखान्यांकडून साखरेवरील वस्तू आणि सेवाकर तथा जीएसटी कर चुकवून साखरेची विक्री सुरू असल्याचे समजते. त्यामुळे केंद्राने कितीही मुबलक कोटा दिला तरी सट्टेबाजांकडून अशा साखरेची खरेदी होऊन दर उंच ठेवण्याकडे कल राहत आहे. सध्या साखरेला मागणी कमीच असल्याचे सांगण्यात आले.

कारखान्यांची तपासणी करावी : राजू शेट्टी

साखर आयुक्तांनी कारखान्यांकडून शिल्लक साखर साठ्याची तातडीने माहिती मागवावी. त्यानंतर गोदामांवर छापे टाकून प्रत्यक्षात साखर किती शिल्लक आहे याची तपासणी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. दै. 'पुढारी'शी बोलताना ते म्हणाले, ज्या साखर कारखान्यांकडे दिलेल्या साठा माहितीशिवाय जादा साखर सापडेल, ती उतारा चोरलेली साखर समजावी आणि अशी साखर वस्तू आणि सेवाकर तथा जीएसटीशिवाय सटोडिये आणि व्यापार्‍यांनी विक्री केली जाते, अशी आमची माहिती आहे. त्यातून काळ्या पैशाला चालना मिळून सरकारचा जीएसटी करचुकवेगिरी होत आहे. त्यामुळे केंद्रिय अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि सचिवांना मी पत्र देऊन देशातील साखर कारखान्यांकडील साखर साठ्यांच्या तपासणीची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news