वाशिम; पुढारी वृत्तसेवा : मनुष्य असो वा प्राणी या दोहोंनाही तीव्र उन्हात सावलीसाठी झाडांची गरज असते. गर्द हिरवी झाडे रखरखत्या उन्हाने व्याकुळ झालेल्या तणाला आणि मनाला दोन्हीलाही गारवा देतात. अशा या बहुमोल झाडांना रखरखत्या उन्हात जगवण्याचे काम राजुरा येथील सुदामा पातळे हा वृद्ध शेतकरी करत आहे. गावच्या स्मशानभूमीसह गोठाणावरील झाडांना भर उन्हात डोक्यावरून हंड्याने पाणी आणून ते या झाडांना जगवण्याचे काम करत आहेत. या वृक्षप्रेमी अवलियाची चर्चा जिल्ह्यासह राज्यात होत आहे.
जिल्ह्यातील राजुरा येथील सुदामा पातळे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते बाराही महिने घरचेच गुरे-ढोरे चारण्याचे काम करतात. बाराही महिने ऊन, वारा, पाऊस झेलत ते रोज सकाळी उठून गुरे सोडणे, दिवसभर उन्हातान्हात गुरांमागे वणवण भटकंती करणे आणि गावातील झाडांना पाणी घालून ती जगवणे ही सुदामा पातळे यांची दिनचर्या आहे.
माणसांना आणि मुक्या जनावरांना या रखरखत्या उन्हात सावलीची गरज असते, मात्र स्मशानभूमी आणि गोठाणावर एकही झाड नसल्यानं सावलीची अडचण निर्माण झाली होती. हे जाणून त्यांनी मागील तीन वर्षांपूर्वी स्मशानभूमी तसेच गुराढोरांसाठीच्या सार्वजनिक गोठाणाजवळ त्यांनी झाडं लावली. भर उन्हातही ही झाडे जगवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. यासाठी सुदामा पातळे हे दूरवरून पाणी आणून झाडांना पाणी देण्याचे काम करत आहेत. रोज नित्यनेमाने सकाळी गुरे चरायला सोडण्यापूर्वी तर सायंकाळी गुरेढोरे गोठ्यात बांधल्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील सार्वजनिक हातपंपावरून पाणी आणून ते झाडांचं संगोपन करीत आहेत. आपला स्वभाव व कृतीशिलतेमुळे ग्रामस्थांनी त्यांना देवा हे नाव दिले आहे.
रखरखत्या उन्हात जनावरे चारताना सावलीचे महत्त्व कळाल्याने सुदामा पातळे यांनी स्मशानभूमी परिसर, गुरांच्या सार्वजनिक गोठाणाजवळ वड, पिंपळ, निंब, बेल यासह घनदाट सावली देणाऱ्या विविध प्रजातींच्या झाडांची लागवड केली. तेव्हापासून ते नित्यनेमाने परिसरातील एका हातपंपावरून पाण्याचा हंडा डोक्यावर घेत ते झाडांना पाणी घालत आहेत. झाडे संगोपनासाठी धडपडणारा हा सुदामा उर्फ देवा परिसरात एक आदर्श ठरला असून, त्यांचे अनुकरण इतरांनी केलं तर वृक्ष संपदा बहरण्यास सुरूवात केली.