कतारमधील ‘त्या’ नौदल अधिकाऱ्यांची सुटका शाहरूखमुळे; ‘या’ नेत्याने मांडले अजब तर्कट

shahrukh khan
shahrukh khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे हेरेगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ८ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका झाल्यानंतर यावरून आता राजकारण सुरू झाले आहे, आणि याला बॉलिवुडचा अँगलही जोडण्यात आला आहे. राज्यसभेतील माजी खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी या अधिकाऱ्यांची सुटका होण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची मुत्सद्देगिरी पूर्ण अपयशी ठरली आणि बॉलिवुड स्टार शाहरूख खान यांच्या मध्यस्थीमुळे या अधिकाऱ्यांची सुटका झाली, असा अजब दावा केला आहे.
स्वामी यांनी या संदर्भात एक्स पोस्ट केली आहे. पण शाहरूख खान याच्या टीमने या सुटकेत शाहरूख खानची काहीच भूमिका नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

स्वामी यांनी यापूर्वीही मोदींवर टीकाटिप्पणी केली आहे. कतारच्या न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय नौदलाच्या ८ अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दोन दिवसांपूर्वीच या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली असून ते सुखरूप भारतात पोहोचले आहेत. या मुत्सद्देगिरीची कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकही करत आहेत. पण माजी खासदार स्वामी यांनी मात्र वेगळेच तर्कट मांडले आहे. ते म्हणतात, "पंतप्रधानांनी कतार दौऱ्यावर शाहरूख खानलाही सोबत नेले पाहिजे. परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय तपास संस्था कतारचे मन वळवण्यात अपयशी ठरली होती, त्यानंतर मोदी यांनी शाहरूख खानला मध्यस्थीची विनंती केली. शाहरूख खानने यात यशस्वी मध्यस्थी केली."

यावर शाहरूख खानची मॅनेजर पूजा दादलानी हिने खुलासा केला आहे. कतारमधून भारतीय अधिकाऱ्यांची जी सुटका झाली, त्याचे श्रेय भारत सरकारचे आहे, यात शाहरूख खानची काहीच भूमिका नव्हती, असे स्पष्टीकरण दादलानी हिने दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news