पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि.१४) इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला. यावेळी चंदीगडमधील पॉलिटेक्निक अँड फार्मसी कॉलेजच्या परिसरात बिहार-काश्मीरमधील विद्यार्थी भिडले. विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी दगड आणि विटांचा मारा झाला. ( T20WC Final Match ) या प्रकारात हॉस्टेल वार्डनसह दोन्ही गटातील विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यावर मोगामधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रविवारी कॉलेजमध्ये विद्यार्थी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहत होते. इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकावर आपली मोहर उमटवली. यानंतर जम्मू आणि काश्मीर व बिहारच्या विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची सुरु झाली. याचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन्ही गटांमधील विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताचा शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले.
जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याचा आरोप बिहारच्या विद्यार्थ्यांनी केला. तर बिहारमधील विद्यार्थ्यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी जसविंदर सिंग यांनी सांगितले की, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांसमोर हाणामारी झाली नाही.आमच्या उपस्थिती पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी केलेली नाही. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यात बोलवून समजूत काढली आहे. सर्व परिसरात शांतता आहे.
हेही वाचा :