पुढारी ऑनलाईन : हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी विरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे तिच्या (Sapna Choudhary) अडचणींमध्ये वाढ झाली आहे. लखनौमधील डान्स इव्हेंटच्या तिकीट विक्रीनंतर शो न करताच, प्रेक्षकांचे पैसे चोरल्याचा सपनावर आरोप आहे. न्यायालयाने तिला ३० ऑगस्टपर्यंत हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
या प्रकरणावर सपना चौधरी (Sapna Choudhary) न्यायालयात हजर राहून जामीन मिळवला होता. त्यानंतर तिला सोमवारी हजर राहण्यास सांगितले होते. परंतू त्यादिवशी सपना हजर राहिली नाही. किंवा त्यांनी गैरहजर राहण्याचा अर्जदेखील न्यायालयाकडे केला नाही. त्यामुळे न्यायालयाने सपना चौधरी विरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
13 ऑक्टोबर, २०१८ रोजी दुपारी 3 ते 10 या वेळेत सपनासह इतर कलाकारांचा कार्यक्रम स्मृती उपवनमध्ये होता. या कार्यक्रमाला प्रति व्यक्ती तीनशे रुपये तिकिट आकारले जात होते. पण या कार्यक्रमात रात्री 10 वाजेपर्यंत सपना चौधरी न आल्याने लोकांनीही गोंधळ घातला. या प्रकरणाच्या तपासानंतर जुनैद अहमद, इबाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर त्रिपाठी यांच्याविरुद्ध २० जानेवारी २०१९ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. तर सपनाविरुद्ध १ मार्च २०१९ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. 26 जुलै २०१९ रोजी न्यायालयाने याची दखल घेतली. पण काही तारखांना न्यायालयाला कोणतीही सूचना न देता गैरहजर राहिल्याने तिच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.