शालेय मुलांना पौष्टिक पोषण बंद ! न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे वाटप नाही 

शालेय मुलांना पौष्टिक पोषण बंद ! न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे वाटप नाही 
पिंपरी(पुणे) : शालेय मुलांना पौष्टिक पोषण मिळावे, या हेतूने गेल्या दोन वर्षांपासून शालेय पोषण आहारात सुरू केलेला न्यूट्रिटिव्ह स्लाईसचा पौष्टिक आहार बंद करण्यात आला आहे.  मुलांच्या आरोग्यासाठी शासन शालेय पोषण आहार योजना राबवित आहे. सामान्य कुटुंबातील मुलांना शाळेची गोडी लागावी आणि पटसंख्या वाढावी, यासाठी राज्य सरकारने शालेय पोषण आहाराची योजना सुरू केली.
त्यातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हा आहार दिला जातो. पिंपरी-चिंचवड शहरात शालेय पोषण आहाराचा लाभ घेणारे पालिका आणि अनुदानित शाळा मिळून सुमारे 95 हजार विद्यार्थी आहेत. 2002 पासून शाळांमधून शिजवलेले गरम जेवण विद्यार्थ्यांना शाळेतच देण्यास सुरुवात झाली. त्यात वरण भात, खिचडीभात, आमटी- भात असा तयार आहार आहे.
योजनेच्या सुरुवातीपासून त्याचे काम महिला बचत गटांकडे होते. त्यानुसार, शहरातील साधारणपणे खासगी आणि महापालिका 547 शाळांमधील सुमारे एक लाख 25 हजार विद्यार्थ्यांना हा आहार पुरविला जात होता; मात्र आहार तयार करणार्‍यांच्या दुर्लक्षामुळे काही अनुचित घटना घडल्या. त्यामुळे सध्या इस्कॉन आणि काही निवडक बचत गटांकडे शालेय पोषण आहाराचे काम देण्यात आले आहे.

काय होते 'न्यूट्रिटिव्ह स्लाईस'?

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 'न्यूट्रिटिव्ह स्लाईस' हा पौष्टिक आहार देण्यात येत होता. या उपक्रमाअंतर्गत ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीनचे मुख्य घटक असलेला पौष्टिक आहार आठवड्यातून पाच दिवस दिला जात होता. शालेय पोषण आहारअंतर्गत तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन यासह लोहयुक्त गव्हाचे पीठ, पीठी साखर, खाद्यतेल, स्किम्ड दूध आणि इतर पोषक घटक वापरून बनविलेल्या या न्यूट्रिटिव्ह स्लाईस सीलबंद पाकिटातून या शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप केले जात होते.

पोषण आहाराचा उद्देश फोल

यामध्ये काहीसा बदल किंवा पोषणमूल्ये वाढविण्याच्या दृष्टीने काही नावीन्यपूर्ण उपक्रम करण्यात आले. उपक्रमात ठराविक दिवशी इडली, उपीट आणि शनिवारी कोरडा खाऊ असे नियोजन आहे. त्यामध्ये बदल करून सध्या फक्त डाळ आणि तांदूळ यांपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश आहे. तांदूळ व अन्न शिजविण्यासाठीच्या खर्चाच्या दराच्या मर्यादेमध्ये धान्यादी मालाच्या स्वरुपात लाभ देण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत; मात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात फक्त डाळ व तांदूळच देण्यात येत आहे. त्यामुळे शालेय पोषण आहाराचा उद्देश खरेच सफल होतोय का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
'न्यूट्रिटिव्ह स्लाईस' ही विशेष बाब म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला होता. काही दिवसच याचे वाटप विद्यार्थ्यांना केले होते. आता यापुढे शासनाचे काही धोरण असेल तर पुन्हा राबविण्यात येईल. सध्या खिचडीभात, आमटी-भात असाच आहार देण्यात येत आहे.
-अंकुश शारंटवार, अधीक्षक,
 शालेय पोषण आहार
मुलांच्या शालेय पोषण आहारातील मिळणारे न्युट्रिटिव्ह स्लाईस मुले आवडीने खात होती. परंतु शासनाने हा आहार बंद करून पुन्हा फक्त आमटी-भात व खिचडी मुलांना देण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी डाळभात मुलांचा रोजचा आहार आहे तो घरातही त्यांना मिळतो. या मुलांना आहारात पोषक अन्न देणे गरजेचे आहे.
-सुरेखा गाडयकवाड, 
पालक
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news