पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे आज गुरुवारी सलग पाचव्या सत्रांत भारतीय शेअर बाजाराने उच्चांकी तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३५० हून अधिक अंकांनी वाढून ७२,४०० वर पोहोचला. तर निफ्टी ८५ अंकांच्या वाढीसह २१,७४० वर गेला. दोन्ही निर्देशांकांचा नवा उच्चांक आहे.
संबंधित बातम्या
भारतीय इक्विटी निर्देशांक आज नवीन विक्रमी उच्चांकावर खुले झाले. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह येत्या मार्चमध्ये लवकरात लवकर व्याजदर कमी करण्यास सुरवात करेल या आशावादामुळे जागतिक बाजारातील तेजीला चालना मिळाली. आज सकाळी रियल्टी स्टॉक्स वगळता सर्वच क्षेत्रांमध्ये वाढ दिसून आली.
सेन्सेक्स आज ७२,२६२ वर खुला झाला. त्यानंतर तो ७२,४०० वर झेपावला. सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, एम अँड एम, टायटन, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स अधिक वाढले आहेत. तर एशिय पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.
निफ्टीवर हिरोमोटोकॉर्प, कोल इंडिया, एम अँड एम, टायटन, एनटीपीसी हे शेअर्स वाढले आहेत. तर अदानी एंटरप्रायजेस, ग्रासीम, आयशर मोटर्स, ॲक्सिस बँक हे घसरले.
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, या महिन्यात आतापर्यंत निर्देशांक प्रत्येकी ८ टक्क्यांनी वाढले आहेत. मजबूत देशांतर्गत आर्थिक आकडेवारी, परकीय गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात वाढता ओघ आणि तेलाच्या किमतीतील घट यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी रोज नवे शिखर गाठत आहेत. मासिक नफादेखील या वर्षी सर्वात जास्त राहिला आहे आणि जुलै २०२२ नंतरचा सर्वाधिक आहे.
फेड रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल या शक्यतेने अमेरिकेतील बाजारात काल तेजी राहिली. या तेजीचा मागोवा घेत आशियाई बाजारांनी गुरुवारी पाच महिन्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला. जपानचा निक्केई निर्देशांक ०.४ टक्क्यांनी खाली आला आहे. तर चीनचा शांघाय कंपोझिट १.१ टक्के आणि हाँगकाँगचा हँग सेंग १.६ टक्क्यांनी वाढला आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) मागच्या सत्रात २,९२६.०५ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) १९२.०१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.