Sensex Nifty hits record high | तेजीचा चौकार! सेन्सेक्स ७२ हजारांवर, निफ्टी २१,६०० पार, गुंतवणूकदारांनी ४ दिवसांत कमावले ११ लाख कोटी | पुढारी

Sensex Nifty hits record high | तेजीचा चौकार! सेन्सेक्स ७२ हजारांवर, निफ्टी २१,६०० पार, गुंतवणूकदारांनी ४ दिवसांत कमावले ११ लाख कोटी

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील तेजीचा मागोवा घेत आज (दि.२७) सलग चौथ्या सत्रात भारतीय शेअर बाजार वधारुन बंद झाला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ७२ हजारांचा टप्पा पार केला. तर निफ्टी ५० ने पहिल्यांदाच २१,६६० वर झेप घेतली. दोन्ही निर्देशांकांचा हा नवा सर्वकालीन उच्चांक आहे. बाजारातील तेजीत बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर राहिले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७५० अंकांनी वाढून ७२,०९२ वर गेला. तर निफ्टीने २३० अंकांची वाढ नोंदवत २१,६६० वर व्यवहार केला. (Sensex Nifty hits record high) त्यानंतर सेन्सेक्स ७०१ अंकांनी वाढून ७२,०३८ वर बंद झाला. तर निफ्टी २१३ अंकांच्या वाढीसह २१,६५४ वर स्थिरावला.

मनीकंट्रोल हिंदीच्या वृत्तानुसार, बाजारातील आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात २.२९ लाख कोटींचा फायदा झाला. तर चार दिवसांत गुंतवणूकदारांची संपत्ती सुमारे ११ लाख कोटींनी वाढली आहे. २६ डिसेंबर रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३५८.९२ लाख कोटी होते. आज २७ डिसेंबर रोजी ते ३६१.२१ लाख कोटी रुपयांवर गेले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज २.२९ लाख कोटींची वाढ झाली. २० डिसेंबर रोजी बाजार भांडवल ३५०.२० लाख कोटी होते. बाजारातील चार दिवसांतील तेजीमुळे गुंतवणूकदारांनी एकूण ११.०१ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

संबंधित बातम्या 

अल्ट्राटेक सिमेंट टॉप गेनर

निफ्टी ५० निर्देशांक २१,४९७ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने २१,६६० वर जात नवा उच्चांक गाठला. निफ्टीवर अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर टॉप गेनर होता. हा शेअर ४ टक्के वाढून १०,४३३ रुपयांवर पोहोचला. हिंदोल्को, बजाज ऑटो हे शेअर्स प्रत्येकी सुमारे ४ टक्के आणि ३.५० टक्क्यांनी वाढले. टाटा मोटर्सचा शेअर्स २ टक्क्यांहून अधिक वाढून ७३९ रुपयांवर पोहोचला. ग्रासीमचा शेअर २ टक्क्यांनी वाढून २,२१४ रुपयांवर गेला. तर एनटीपीसी, ओनजीसी, ब्रिटानिया हे शेअर्स घसरले.

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, एसबीआय, एम अँड एम, इंडसइंड बँक, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एलटी, इन्फोसिस हे शेअर्स वाढले. तर एनटीपीसी, टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले.

निफ्टी बँक निर्देशांकही वधारला

एनर्जी वगळता सर्व क्षेत्रांनी आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. निफ्टी बँक निर्देशांकाने प्रथमच १ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवून ४८,३०० चा टप्पा ओलांडला. ऑटोमोबाइल, फार्मा, मेटल आणि पीएसयू बँक निर्देशांक ०.५-१.३ टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे, एफएमसीजी, आयटी आणि कॅपिटल गुड्स निर्देशांकात किरकोळ वाढ झाली.

परदेशी गुंतवणूकदार

एनएसडीएलच्या (NSDL) च्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) डिसेंबरमध्ये ५७,२७५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. या महिन्यात ते निव्वळ खरेदीदार राहिले आहेत. ज्यावेळी परदेशी गुंतवणूकदार विक्रीचा पर्याय निवडतात, त्यावेळी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार खरेदीवर जोर देऊन ही पोकळी भरून काढत आहेत.

जागतिक बाजार

फेडरल रिझर्व्ह मार्चपर्यंत व्याजदरात कपात करेल या आशेने अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक काल वधारुन बंद झाले होते. आशियाई बाजारातही आज सकारात्मक वातावरण राहिले. जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा एमएससीआय निर्देशांक ०.६५ टक्क्यांनी वाढला. जपानचा निक्केई (Nikkei) निर्देशांक १.२ टक्क्यांनी वाढला. हाँगकाँगचा हँगसेंग (Hang Seng Index) ख्रिसमस सुट्टीनंतरच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात वर गेला. (Sensex Nifty hits record high)

तेलाच्या किमती

आज सुरुवातीच्या आशियाई व्यवहारात तेलाच्या किमती घसरल्या. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स ०.०५ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ८०.८१ डॉलरवर आले. यूएस डब्ल्यूटीआय क्रूड फ्यूचर्स ०.२१ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ७५.४१ डॉलरवर होते.

Back to top button