पुढारी ऑनलाईन : अंतरिम अर्थसंकल्पाच्या दिवशी थंड प्रतिसाद दिलेल्या शेअर बाजारात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी जोरदार खरेदी दिसून आली. जागतिक बाजारातून मजबूत संकेत आणि आयटी, मेटल शेअर्समधील तेजीच्या जोरावर आज सेन्सेक्स, निफ्टी तेजीत राहिले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स १,४०० अंकांनी वाढला. तर निफ्टीने २२,१२० पर्यंत चाल केली. त्यानंतर सेन्सेक्स ४४० अंकांच्या वाढीसह ७२,०८५ वर स्थिरावला. तर निफ्टी १५६ अंकांनी वाढून २१,८५३ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell)
क्षेत्रीय पातळीवर ऑईल आणि गॅस निर्देशांक ४ टक्के, आयटी, मेटल, रियल्टी, पॉवर निर्देशांक प्रत्येकी १-२ टक्क्यांनी वाढले, तर बँक निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढला.
बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी ३.३३ लाख कोटी रुपयांची कमाई केली. १ फेब्रुवारी रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३७९.४२ लाख कोटी रुपये होते. ते आज २ फेब्रुवारी रोजी ३८२.७५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.३३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
सेन्सेक्स आज ७१,९७७ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ७३ हजाराला स्पर्श केला. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, एनटीपीसी, टीसीएस, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, इन्फोसिस, रिलायन्स, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
निफ्टीवर बीपीसीएलचा शेअर्स टॉप गेनर्स राहिला. हा शेअर्स ९ टक्क्यांनी वाढून ५५६.८ रुपयांवर पोहोचला. पॉवर ग्रिड, ओएनजीसी, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी हे शेअर्सही ३ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर आयशर मोटर्स, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाईफ, ॲक्सिस बँक हे टॉप लूजर्स होते.
२०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या घोषणेच्या एका दिवसानंतर PSU बँकांचे शेअर्स बीएसईवर २० टक्क्यांपर्यंत वाढले. बाँड यिल्डमध्ये घट झाल्याने त्यांच्या ट्रेझरी पोर्टफोलिओला चालना मिळेल हे यामागील कारण होते. आशियाई बाजारातून सकारात्मक संकेत तसेच आयटी शेअर्समधील मजबूत वाढीमुळे भारतीय शेअर बाजाराला सपोर्ट मिळाला. (Sensex Nifty Today)
गुरुवारीच्या घसरणीतून सावरत शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्सने तब्बल १,४०० अंकांनी वाढून ७३ हजारांच्या अंकांला स्पर्श केला. तर निफ्टी ४०० अंकांच्या वाढीसह २२,१०० पर्यंत गेला. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स ७२,४०० च्या खाली आला. तर निफ्टी २१,८५० वर स्थिरावला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणानंतर अंतरिम अर्थसंकल्पावर अधिक स्पष्टता आल्याने बाजाराने अर्थसंकल्पीय घोषणांवर जोरदार प्रतिसाद दिला. (Stock Market Closing Bell)
पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्स कालच्या २० टक्क्यांच्या घसरणीनंतर बीएसईवर आज आणखी २० टक्क्यांनी खाली येऊन ४८७ रुपयांवर आला. (One97 Communications Share Price) रिझर्व्ह बँक इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन क्रेडिट आणि डिपॉझिट ऑपरेशन्स, टॉप-अप्स, फंड ट्रान्सफर आणि इतर बँकिंग ऑपरेशन्स फेब्रुवारी अखेरीस थांबवण्यास सांगितल्यानंतर वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्स काल २० टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किटमध्ये गेले होते. आज पुन्हा हा शेअर्स २० टक्क्यांनी घसरला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणानंतर अंतरिम अर्थसंकल्पावर अधिक स्पष्टता आल्याने बाजाराने अर्थसंकल्पीय घोषणांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
इंडेक्स हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चा शेअर्स सकाळच्या व्यवहारात ३ टक्क्यांनी वाढून २,९४० रुपयांवर जात ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला.
गुरुवारी देशांतर्गत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी कमी पातळीवर बंद झाले होते. यूएस फेडने व्याजदर जैसे थे कायम ठेवून लवकर दर कपात करणार नसल्याचे संकेत आहे. यामुळे जागतिक भावनावर गुरुवारी त्याचा परिणाम दिसून आला होता. पण रोजगाराच्या अहवालांवर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे गुरुवारी अमेरिकेच्या बाजारातील निर्देशांक वाढून बंद झाले. डाऊ जोन्स ०.९७ टक्के, एस अँड पी १.२५ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट १.३० टक्क्यांनी वाढला. आशियाई बाजारावर नजर टाकल्यास जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंगही तेजीत राहिले. दरम्यान, चीनचा शांघाय कंपोझिटमध्ये घसरून दिसून आली.
हे ही वाचा :