पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आणखी व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेचा पुनरुच्चार केला आहे. याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स २८४ अंकांनी घसरून ६३,२३८ वर बंद झाला. तर निफ्टी ८५ अंकाच्या घसरणीसह १८,७७१ वर स्थिरावला. PSU बँक आणि पॉवर स्टॉक्स प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. बहुतांश सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी आज लाल चिन्हात व्यवहार केला. मेटल, FMCG, फार्मा, आयटी स्टॉक्सही घसरले. BSE मिडकॅप निर्देशांक १ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी घसरला.
बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स, निफ्टी सपाट झाला. त्यानंतर सेन्सेक्सची वाटचाल घसरणीच्या दिशेने झाली. दरम्यान, सेन्सेक्सने (Sensex) सकाळच्या व्यवहारात ६३,६०१ वर झेप घेत सर्वकालीन उच्चांक गाठला होता. काल सेन्सेक्सने ६३,५८८ वर विक्रमी झेप घेतली होती. आज याही पुढे जात सेन्सेक्सने ६३,६०१ वर झेप घेत नवीन विक्रमी उच्चांक केला. पण तो काही वेळातच उच्चांकावरून खाली आला. (Stock Market Updates) निफ्टी (Nifty) १८,८५० वर स्थिरावला.
काल सेन्सेक्स ६३,५२३ वर बंद झाला होता. आज गुरुवारी सेन्सेक्स (Sensex Updates) ६३,६०१ वर खुला झाला होता. आजच्या व्यवहारात तो ६३,३२७ पर्यंत खाली आला. आज ऑटो स्टॉक्स वाढले आहेत. तर आयटीमध्ये घसरण दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर टाटा स्टील, एलटी, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयटीसी, भारती एअरटेल या शेअर्सनी तेजीत व्यवहार केला. तर इन्फोसिस, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, एनटीपीसी, टीसीएस, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले.
क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेसने १६,६९५ वर जात ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. निफ्टी ऑटो आणि निफ्टी बँकदेखील वाढले. निफ्टी मिडकॅप १०० हा ०.०३ टक्के घसरला, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० हा ०.४० टक्के वाढला.
दरम्यान, २.५ टक्के इक्विटी ब्लॉक डील दरम्यान भारतीय लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन कंपनी Delhivery चे शेअर्स एनएसई (NSE) वर सुमारे ७ टक्क्यांनी वाढले. अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म कार्लाइलने या ई-कॉमर्स लॉजिस्टिक कंपनीमधील २.५३ टक्के भागीदारी विकल्याचा वृत्तानंतर Delhivery चे शेअर्स वधारले.
ब्रोकरेजने शेअरचे रेटिंग कमी केल्याने फार्मा उद्योगातील प्रमुख कंपनी लुपिनचे शेअर्स (Lupin Share Price) बीएसईवर गुरुवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये सुमारे ४ टक्क्यांनी घसरून ८३८ रुपयांवर आले होते. त्यानंतर हा शेअर ८४६ रुपयांवर स्थिरावला.
NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी ४,०१३ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी ५५० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज आणि S&P ५०० हे घसरले. नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक १.२ टक्के घसरला. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा विस्तृत निर्देशांक खाली आला आहे. आठवडाभरात या निर्देशांकात २ टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा S&P/ASX 200 निर्देशांक १.५८ टक्के आणि जपानचा Nikkei ०.९२ टक्क्याने घसरला. चीन आणि हाँगकाँगमधील शेअर बाजार सुट्टीमुळे बंद आहेत.
हे ही वाचा :