Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला, गुंतवणूकदार २ लाख कोटींनी श्रीमंत, तेजीमागे ‘हे’ ५ घटक ठरले महत्त्वाचे

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला, गुंतवणूकदार २ लाख कोटींनी श्रीमंत, तेजीमागे ‘हे’ ५ घटक ठरले महत्त्वाचे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) आज सोमवारी (दि.९) तेजीत व्यवहार केला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) ८०० अंकांनी वाढून ६२ हजारांच्या जवळ पोहोचला. तर निफ्टीने (Nifty) १८,२५० ची पातळी ओलांडली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ६०० हून अधिक अंकांनी वाढून ६१,६८० वर होता. तर निफ्टी १७५ अंकांच्या वाढीसह १८,२४० वर होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांक आणखी वधारले. सेन्सेक्स ७०९ अंकांच्या वाढीसह ६१,७६४ वर बंद झाला. तर निफ्टी १९५ अंकांनी वाढून १८,२६४ वर स्थिरावला. सेन्सेक्सची ही आजची वाढ १.१६ टक्के एवढी आहे. तर निफ्टी १.०८ टक्के वाढला.

बाजारातील तेजीत बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर राहिले. आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (market capitalisation) २ लाख कोटींनी वाढून २७५.८६ लाख कोटींवर पोहोचले. गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजी सेन्सेक्सने ६३,५८३ वर झेप घेतली होती. या उच्चांकापासून सेन्सेक्स आता १,८०० अंक दूर आहे. काही विदेशी ब्रोकरेजनी भारतीय शेअर्सबाबत तटस्थ भूमिका घेतली असतानाही बाजारात तेजी राहिली, हे विशेष! (Stock Market Closing Bell)

'हे' होते टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर (sensex today) इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, एनटीपीसी, एम अँड एम, कोटक बँक, ॲक्सिस बँक, अल्ट्रा टेक, मारुती, पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय, रिलायन्स आणि एचडीएफसी हे शेअर्स टॉप गेनर्स होते. हे शेअर्स १ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढले. सन फार्मा, एलटी, नेस्ले हे शेअर्स घसरले. (Stock Market Opening Bell) PSU बँक निर्देशांक आज सुमारे १ टक्के घसरला.

Paytm चे शेअर्स ५ टक्क्यांनी वाढले

मार्च तिमाहीत तोटा लक्षणीयरित्या कमी केल्यानंतर पेटीएमचे (Paytm) शेअर्स सुमारे ५ टक्क्यांनी वाढले. भारतातील सर्वात मोठी आणि तेलंगणातील पहिली गिगाफॅक्टरी लॉन्च केल्यानंतर अमरा राजा बॅटरीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले आहेत.

बँकिंग स्टॉक्समध्ये सुधारणा

आजच्या तेजीत बँका आणि इतर फायनान्सियल स्टॉक्सचा मोठा वाटा होता. इंडसइंड बँकेचे शेअर्स आज सर्वाधिक वाढले. तर बजाज फायनान्स (Bajaj Finance) आणि बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) हे शेअर्स प्रत्येकी सुमारे ४ ते ५ टक्क्यांनी वाढले. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरणीतून काही प्रमाणात सावरताना दिसत आहेत. हे शेअर्स गेल्या शुक्रवारी ५ टक्क्यांनी घसरले होते.

FII ची भारतीय बाजारात गुंतवणूक वाढली

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढीचा वेग कमी केला आहे असे मानले जात असतानाच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) पुन्हा एकदा भारतीय बाजारात गुंतवणुकीस सुरुवात केली आहे. गेल्या ७ ट्रेडिंग सत्रात परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात निव्वळ खरेदीदार राहिले आहेत. गेल्या आठ दिवसांत FII नी ११,७०० कोटींच्या शेअर्सची खरेदी केली आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या सुरुवातीपासून FII नी एकूण २२,५०० कोटींची गुंतवणूक केली आहे.

आशियातील बाजारात संमिश्र वातावरण

अमेरिकेतील आर्थिक मंदीची गुंतवणूकदारांनी धास्ती घेतली आहे. सोमवारी टोकियोतील शेअर बाजारात घसरण झाली. बेंचमार्क निक्केई २२५ निर्देशांक (Nikkei index) २०८ अंकांनी घसरून २८,९४९ वर बंद झाला, तर व्यापक टॉपिक्स निर्देशांक ०.२१ टक्के म्हणजेच ४.३२ अंकांनी घसरून २,०७१ वर आला. चीनच्या शांघाय कंपोझिटमध्ये ०.०९ टक्के वाढ झाली. तर हाँगकाँगचा हँग सेंग ०.४३ टक्क्यांनी तर कोरियाचा कोस्पी (kospi index) ०.९४ टक्क्यांनी वधारला.

कच्च्या तेलाचे दर

कच्च्या तेलाच्या (Crude oil) दरात सलग तीन आठवडे घसरण झाली होती. त्यानंतर आता ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.२ टक्के वाढून आज प्रति बॅरल ७५.४१ डॉलरवर गेले आहे. अमेरिकेतील बँकिंग संकटामुळे अर्थव्यवस्थेला ब्रेक लागेल आणि जगातील सर्वात मोठ्या तेलाचा वापर करणार्‍या देशात इंधनाची मागणी कमी होईल या भीतीने गेल्या आठवड्यात ब्रेंट बेंचमार्क ५.३ टक्के घसरला होता.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news