Stock Market Closing Bell | RBI च्या निर्णयामुळे शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स ३०७ अंकांनी घसरून बंद, बँकिंगला मोठा फटका

Stock Market Closing Bell | RBI च्या निर्णयामुळे शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स ३०७ अंकांनी घसरून बंद, बँकिंगला मोठा फटका

पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीने रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. आज सेन्सेक्स ३०७ अंकांनी घसरून ६५,६८८ वर बंद झाला. तर निफ्टी ८९ अंकांच्या घसरणीसह १९,५४३ वर स्थिरावला. मेटल आणि पॉवर वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल चिन्हात बंद झाले. बाजारातील आजच्या घसरणीचा सर्वाधिक फटका एफएमसीजी (FMCG) आणि PSU बँक यांना बसला. हे क्षेत्रीय निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. तर कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर आणि आयटी ०.५ टक्क्यांनी खाली आले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण झाली. (Stock Market Closing Bell)

आरबीआयच्या पतधोरण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल ४५० अंकांनी घसरून ६५,५३९ वर आला. तर निफ्टी ११८ अंकांनी घसरून १९,५०० वर होता.

'हे' शेअर्स घसरले

सेन्सेक्स आज ६५,९४५ वर खुला झाला. त्यानंतर तो ६५,५०० पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, आयटीसी, कोटक बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टीसीएस, एचसीएल टेक हे शेअर्स घसरले. तर इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, एम अँड एम, रिलायन्स, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, विप्रो या शेअर्सनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला. इंडसइंड बँकेचा शेअर १.८० टक्के वाढून १,४३२ रुपयांवर पोहोचला. तर जेएसडब्ल्यू स्टील १.२५ टक्के वाढून ८३२ रुपयांवर गेला.

रेपो रेट जैसे थे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट जैसे थे म्हणजे ६.५० टक्के एवढा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा आरबीआयने रेपो दरात बदल केलेला नाही. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत (Monetary Policy Committee) घेतलेल्या या निर्णयाची आज माहिती दिली. (RBI monetary policy) "पतधोरण समितीने रेपो रेट ६.५० टक्के एवढा कायम ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे", असे शक्तिकांत दास यांनी सांगितले.

बँकिंग स्टॉक्समध्ये विक्री, 'हे' ठरले कारण

१९ मे ते २८ जुलै या कालावधीसाठी कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच 'सीआरआर' (CRR) लागू करण्यात आला आणि आरबीआय ८ सप्टेंबर रोजी त्याचा आढावा घेईल, असे दास यांनी म्हटले आहे. हे पाऊल निव्वळ तात्पुरता उपाय असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. "कार्यक्षमपणे तरलता व्यवस्थापनासाठी अतिरिक्त तरलतेच्या पातळीचे सतत मूल्यांकन करणे आवश्यक आहे, जेणेकरुन अतिरिक्त तरलतेचा घटक पकडण्यासाठी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा अतिरिक्त उपाययोजना केल्या जातील," असे दास म्हणाले. दास यांनी गुरुवारी बँकांना सीआरआर अंतर्गत वाढीव ठेवींचा मोठा भाग नजीकच्या काळात तरलता (liquidity) मजबूत करण्यासाठी बाजूला ठेवण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे प्रणालीतील १ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त तरलता बाहेर काढण्यात मदत होईल, असे गव्हर्नर म्हणाले. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय जाहीर करत असताना दास यांनी ही टिप्पणी केली. दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयामुळे बाजारातील तरलतेच्या स्थितीबद्दल चिंता निर्माण झाली आणि परिणामी बँकिंग स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली. निफ्टी बँक आज ३०० हून अधिक अंकांनी घसरून ४४,५४८ वर आला. यावर बहुतांश स्टॉक्सनी आज लाल चिन्हात व्यवहार केला. एयू स्मॉल फायनान्स बँक, कोटक बँक, बंधन बँक यात सर्वाधिक घसरण दिसून आली. (Stock Market Closing Bell)

आशियाई बाजारातील स्थिती काय?

जपानचा निक्केई निर्देशांक आज उच्च पातळीवर बंद झाला. या निर्देशाकांने सुरुवातीचा तोटा मागे टाकेत आघाडी घेतली. निक्केई ०.८४ टक्के वाढून ३२,४७३ वर बंद झाला. सुरुवातीला यात ०.५८ टक्के घसरण झाली होती. तर टॉपिक्स ०.९२ टक्के वाढून २,३०३ रुपयांवर गेला. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयांवर प्रभाव टाकणाऱ्या ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाई अहवालाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील शेअर बाजारात बुधवारी घसरण झाली होती.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news