Closing Bell | सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण, सेन्सेक्स ६५ हजारांखाली, पडझडीची ‘ही’ आहेत कारणे

Closing Bell | सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण, सेन्सेक्स ६५ हजारांखाली, पडझडीची ‘ही’ आहेत कारणे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण राहिली. आज सेन्सेक्स २०२ अंकांनी घसरून ६४,९४८ वर बंद झाला. तर निफ्टी ५५ अंकांनी घसरून १९,३१० वर स्थिरावला. एफएमसीजी आणि पॉवर वगळता आयटी निर्देशांक १.५ टक्के आणि मेटल निर्देशांक जवळपास १ टक्क्यांनी घसरून लाल चिन्हात बंद झाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले.

टीसीएसचा शेअर टॉप लूजर

सेन्सेक्स आज ६५,०२५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५ हजारांच्या खाली आला. सेन्सेक्सवर टीसीएसचा शेअर टॉप लूजर राहिला. हा शेअर २ टक्क्यांहून अधिक घसरून ३,३६४ रुपयांवर आला. टेक महिंदा, एम अँड एम, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर मारुतीचा शेअर सुमारे १ टक्के वाढून ९,४६७ रुपयांवर पोहोचला. रिलायन्सचा शेअर सुमारे १ टक्के वाढून २,५५६ रुपयांवर गेला. ॲक्सिस बँक, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा मोटर्स या शेअर्सनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला.

निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स, आयशर मोटर्स, नेस्ले इंडिया, ब्रिटानिया हे शेअर्स वधारले. तर हिरो मोटोकॉर्प, टीसीएस, हिंदाल्को, टेक महिंद्रा, इन्फोसिस हे शेअर्स घसरले.

जियो फायनान्सियलच्या लिस्टिंगच्या घोषणेनंतर रिलायन्सला बुस्ट

बाजाराला आज काही प्रमाणात रिलायन्स शेअर्सचा सपोर्ट मिळाला. जियो फायनान्सियलच्या लिस्टिंग तारखेच्या घोषणेनंतर रिलायन्सचा शेअरमध्ये तेजी आली. रिलायन्सकडून सांगण्यात आले आहे की त्यांचा स्टॉक २१ ऑगस्ट रोजी एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केला जाईल. या वृत्तानंतर रिलायन्सच्या शेअरमध्ये जोरदार रिकव्हरी झाली. कमकुवत बाजारातही बीएसईवर हा शेअस सुमारे १ टक्के वाढून २,५५० रुपयांवर पोहोचला.

बाजारातील पडझडीची 'ही' आहेत कारण

किरकोळ महागाई १५ महिन्यांच्या उच्चांकावर गेल्यानंतर संपूर्ण आठवडाभर देशांतर्गत बाजारांमध्ये अस्थिरता दिसून आली आहे. चीनमधील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. विशेषतः मोठ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांना याचा परिणाम जाणवू लागला आहे. जागतिक पुरवठा साखळी राखण्यात चीनची महत्त्वाची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजार आणि अर्थव्यवस्था चीनमधील आर्थिक स्थितीबद्दल चिंतित आहेत. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह पुन्हा एकदा व्याजदरवाढ करणार असल्याच्या शक्यतेनेही अमेरिकेसह आशियाई बाजारात पडझड होताना दिसत आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news