एक्साईजने डोंगर पोखरून काढला उंदीर; कारवाईचा नुसताच गाजावाजा

एक्साईजने डोंगर पोखरून काढला उंदीर; कारवाईचा नुसताच गाजावाजा
Published on
Updated on

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सायंकाळची वेळ…, काळेवाडी येथील विजयनगर परिसरात लाल दिवा असलेली आठ ते दहा शासकीय वाहने दाखल झाली. अचानक तीस ते चाळीस अधिकारी आणि कर्मचारी गाडीतून उतरले. बंद पडक्या खोलीजवळ जाऊन थबकले. त्यानंतर कारवाई सुरुवात झाली. त्या वेळी कोणीतरी मुंबईचा नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांचा फोटो काढून मीडियावर व्हायरल करतो. त्यानंतर बिनबुडाच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात.

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, पुणे पोलिसांची पिंपरीत कारवाई, अशा पोस्ट फिरतात. यातील कळस म्हणजे काहींनी तर थेट एन्काउंटर केल्याच्या शंका व्यक्त केल्या. ज्यामुळे काही मिनिटांतच वातावरण तणावपूर्ण झाले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. माध्यमांचे प्रतिनिधी धावत पळत स्पॉटवर पोहोचले. त्या वेळी अवघ्या 22 किलो गांजासाठी एक्साईजने (राज्य उत्पादन शुल्क) ही उठाठेव केल्याचे समोर आले. एकंदरीतच कारवाईचा गाजवाजा पाहून एक्साईजने डोंगर पोखरून काढला उंदीर, अशा चर्चा सुरू होत्या.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काळेवाडी येथील विजयनगर परिसरात मुख्य रस्त्यालगत पडक्या खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये गांजा असल्याची खबर एक्साईजला मळाली. त्यानुसार, मोठ्या फौजफाट्यात येऊन एक्साईजने कारवाई केली. या कारवाईत वीस ते बावीस किलो गांजा मिळून आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे शहरात राजरोसपणे अवैध प्रकारे दारू विक्री होत असताना एक्साईजने किरकोळ गांजाकडे आपला मोर्चा वळवल्याने दिवसभर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

कारवाई वादाच्या भोवर्‍यात

पिंपरी-चिंचवडमध्ये काही वर्षांपूर्वी दोन व्यापार्‍यांच्या गाडीत जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. व्यावसायिक वादातून एकमेकांच्या गाडीत या कांड्या ठेवण्याचा प्रकार तपासातून उघड झाला होता. दरम्यान, एक्साईजने कारवाई केलेल्या जागेच्या मालकीवरून वाद सुरू आहे. नुकतेच संबंधित जागामालकाला हॉटेल पाडण्याबाबतची नोटीस नुकतीच महापालिकेने बजावली आहे. त्यामुळे कोणीतरी एक्साईजला हाताशी धरून जाणीवपूर्वक गांजा ठेवल्याची चर्चा आहे.

माध्यमांपासून लपवाछपवी

एक्साइजने कारवाई केल्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी कारवाईची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संपूर्ण कारवाई झाल्यानंतर माहिती देऊ, असे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर 24 तास उलटूनही एक्साइजकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. अधिकृत माहिती घेण्यासाठी उपअधीक्षक शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी पुन्हा वरिष्ठांना विचारून सांगतो, असे म्हणत वेळ मारून नेली.

एक्साईजचा छापा; ज्ञानात भर

अवैध दारूला प्रतिबंध करण्याचे मुख्य काम सोडून एक्साईजने गांजावर पहिल्यांदाच कारवाई केली. ज्यामुळे एक्साईजलादेखील गांजावर कारवाई करण्याचे अधिकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र, कारवाई करताना पिंपरी-चिंचवड एक्साईज विभागदेखील थरथरत होता. त्यामुळे या स्पेशल टास्कसाठी दौंड येथून काही गांजा कारवाईत एक्सपर्ट असलेल्या अधिकार्‍यांना पाचारण केले होते. त्याचबरोबर सरकारी पंच म्हणून महापालिकेतील कर्मचार्‍याला दुपारपासूनच सोबत ठेवले होते. पिंपरी-चिंचवडचे निवासी नायब तहसीलदार प्रवीण ढमाले यांनादेखील बोलावून घेण्यात आले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कोणत्याच विभागाला याबाबत कल्पना देण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणजीत रजपूत यांनादेखील कारवाईबाबत माहिती नव्हती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news