श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षेंचा राजीनामा स्वीकारला, नवीन राष्ट्रपती निवडीसाठी संसदेचे अधिवेशन बोलावले

श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षेंचा राजीनामा स्वीकारला, नवीन राष्ट्रपती निवडीसाठी संसदेचे अधिवेशन बोलावले

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : श्रीलंकेत हिंसक निदर्शने सुरुच आहेत. दरम्यान, देश सोडून सिंगापूरमध्ये पोहोचलेले राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Sri Lanka President Gotabaya Rajapaksa) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्देना यांनी दिली आहे. "होय, राष्ट्रपतींचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जाईल. सदस्यांना उद्या राष्ट्रपती निवडण्यासाठी आमंत्रित केले जाईल," असे महिंदा यापा अबेवर्देना यांनी सांगितले. संसदेद्वारे नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हे अंतरिम अध्यक्ष म्हणून शपथ घेतील. नवीन राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी शनिवारी संसदेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे, असे अबेवर्देना यांनी सांगितले. सात दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्रीलंकेकडे अन्न, शेतीसाठी खते आणि इंधन यासारख्या मूलभूत गरजांच्या आयातीसाठी पैशांची मोठी टंचाई आहे. यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात निर्दशने सुरु आहेत. गोटाबाया राजपक्षे यांनी गेल्या बुधवारी वाढत्या निदर्शनांदरम्यान देश सोडून मालदीवमध्ये पलायन केले. त्यानंतर ते गुरुवारी सिंगापूरमध्ये पोहोचले.

श्रीलंका आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर देशांकडून मदत मागत आहे. परंतु देशाची आर्थिक स्थिती इतकी खराब आहे की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले आहे, असे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी नुकतेच म्हटले होते.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी (state of emergency)  जाहीर करण्यात आली. जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आंदोलक राष्ट्रपती भवनातच ठाण मांडून राहतील, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. राष्ट्रपती आणि पंतप्रधान निवासस्थानातील आंदोलकांनी मौजमजा केल्याची छायाचित्रे, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news