नुकताच डॉक्टर झालेल्या तरुणावर काळाचा घाला

अजिंक्य सांगळे
अजिंक्य सांगळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा

एका मित्राच्या लग्नासाठी रस्त्याच्या कडेने पायी जात असताना भरधाव कंटेनरने दोघांना उडवलं आणि नुकत्याच डॉक्टर झालेल्या तरुणावर काळाने घाला घातला. त्याचं अधिकारी व्हायचं स्वप्नही अधुरंच राहिलं. अजिंक्य मोहन सांगळे (26, रा. सिंहगडरोड, पुणे) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

अहमदाबाद येथून घाई घाईने याच लग्नासाठी आलेला आर्कीटेक्ट तरुण मोहित मधुकर घोलप (25, रा. विद्याविहार कॉलनी, डी. पी. रोड, माळवाडी) या अपघातात गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अज्ञात कंटेनर चालकावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजिंक्यचे वडील शिक्षक असून आई गृहिणी आहे. अजिंक्यचा मागील आठवड्यात बीडीएसचा निकाल लागला. त्यात तो पास होऊन डॉक्टर झाला. आयुष्य एकाच कॉलनीत घालविलेल्या एका मित्राच्या लग्नासाठी तो आपल्या इतर मित्रांसह पोहचणार होता. कुंजीरवाडी येथील गोविंद सागर कार्यालयात हा लग्न समारंभ होता. धिरज काळे आणि आशिष उबाळे हे अदोगर लग्नस्थळी पोहचले. त्यानंतर अजिंक्य आणि मोहित घोलप हे एकत्र मंडपात पोहचले.

कोल्ड्रींक पिण्यासाठी बाहेर पडले आणि…

मोहीत त्याचे अहमदाबाद येथे सुरू असलेले आर्कीटेक्टचे काम उरकून पुण्यात आला होता. चौघे लग्न कार्यालयात एकत्र आले. तेथे त्यांनी गप्पा मारल्या. तेथे अजिंक्य बरोबर चर्चा करताना त्याने पुढे आता युपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं त्याचं स्वप्न असल्याचे मित्रांना सांगितले. गप्पा संपल्यानंतर कोल्ड्रींक पिण्यासाठी ते सोलापूर रस्ता क्रॉस करून रस्त्याच्या पलीकडे गेले. कार्यालयाकडे येण्यासाठी पुन्हा त्यांनी रस्ता क्रॉस केला. यावेळी धिरज आणि आशिष हे पुढे रत्यांच्या कडेला असलेल्या मातीतून चालले होते. त्यांच्या पाठोपाठ अजिंक्य आणि मोहित चालले होते. काही कळण्याच्या आतच भरधाव असलेल्या कंटेनरने दोघांना उडवले.

मदतही मिळाली नाही

धिरज आणि आशिष यांनी हा प्रकार पाहिला. दोघेही लगेचच त्यांच्या मदतीसाठी धावले परंतु, अजिंक्यचा जागीच मृत्यू झाला होता. तर मोहित गंभीर जखमी झाल्याचे त्यांना दिसले. दोघांनी रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना दोघांना दवाखान्यात नेण्यासाठी विनवणी केली. परंतु, कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. परंतु, धिरजने आपल्यासोबत कार आणली होती. त्याने लागलीच आशिषला कार घेऊन येण्यास सांगितले. दोघांनी मोहितला कारमध्ये ठेवून त्याला लोणीतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. मोहितच्या डोक्याला थोडासा मार लागला असून, सध्या मोहितची प्रकृती स्थिर आहे. गुरूवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कंटेनर चालकाचा सध्या शोध घेण्यात येत असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news