Dilip Walse- Patil : राज्यात लवकरच ७ हजार पोलिसांची भरती : दिलीप वळसे- पाटील | पुढारी

Dilip Walse- Patil : राज्यात लवकरच ७ हजार पोलिसांची भरती : दिलीप वळसे- पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना महामारीमुळे राज्यातील अनेक विभागातील रिक्त पदे अद्यापही भरलेली नाहीत. पोलीस खात्यातील ५० हजार रिक्त पदे भरली जाणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे पोलीस भरतीकडे राज्यातील तरुणांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, पोलीस भरतीबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात ५० हजार पोलिसांची रिक्त पदे असून ७ हजार पदे भरण्यासाठी १५ जूनपासून प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे वळसे-पाटील (Dilip Walse- Patil)  यांनी सांगितले.

दरम्यान, आणखी १५ हजार पदे भरण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. पोलिसांवर मोठा ताण असल्यामुळे या मोठ्या भरतीसाठी राज्य मंत्रिमंडळ परवानगी देईल, असा विश्वास वळसे -पाटील यांनी व्यक्त केला. ही भरती झाल्यानंतर पोलिसांवरील जाण हलका होण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे, असे ते  (Dilip Walse- Patil) म्हणाले.

गेम खेळण्यासाठी नागरिक आणि मुलांकडून अनेक अॅपबेस्ड कंपन्यांकडून कर्ज घेत आहेत. परंतु अशा प्रकारात फसवणुकीचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. गरजेसाठी कर्ज घेणे वेगळी गोष्ट आहे, परंतु असे केल्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत. यावर राज्य सरकारकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे अनावश्यक कर्ज काढणे टाळले पाहिजे. राज्यात सायबर क्राईमचा रेट वाढलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण वाढलेला आहे, असेही ते म्हणाले.

पोलिसांच्या घरांच्या प्रलंबित प्रश्नावर ते म्हणाले की, पोलिसांच्या घरासाठी दरवर्षी ८०० कोटींचा निधी दिला जात आहे. अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांना स्व:ताचे घर मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही वळसे-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button