कडेगाव रजाअली पिरजादे : यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. मात्र पाऊस उशिरा जुलै महिन्यात सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. पावसाने दडी दिल्याने यावर्षी खरीप हंगाम पेरणी थोडी उशिरा होणार आहे. यावर्षी तालुक्यात सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होणार आहे. यासाठी कृषी विभाग सज्ज झाले आहे. बियाणे व खते शेतकर्यांना वेळेवर मिळावे व जादा पैशांची आकारणी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.
तालुक्याचे एकूण ५८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी पिकावू क्षेत्र जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यात सिंचन योजनांचे पाणी खेळू लागले आहे. त्यामुळे तालुक्यात शाश्वत उसाचे मोठे क्षेत्र आहे. तालुक्यात जवळपास 25 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक घेतले जाते.तर सुमार 21 हजार हेक्टर क्षेत्र खरीप पिकाचे आहे. सध्या तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सुमारे 500 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. पावसाचा अंदाज घेत पेरणी करण्याकडे शेतकर्यांनी कल दिला आहे.
प्रतिवर्षी तालुक्यात खरीप हंगामासाठी सोयाबीन व ज्वारी आणि भुईमूग या पिकाकडे शेतकर्यांचा अधिक कल असतो. यावर्षीही याच पारंपरिक पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे आडसाली ऊस लागणीच्यादृष्टीने शेतकर्यांनी जमिनीची मशागती करून सरी सोडण्याचे काम सुरू केले आहे.
ज्वारी : 8000, सोयाबीन : 5600, भुईमूग : 4000, बाजरी : 25, भात : 100, मका : 1190 , तूर : 500 , उडीद : 400, मग : 700, सूर्यफूल : 400 असे सुमारे 21 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
शेतकर्यांनी खरीप हंगामाची पेरणीची घाई करू नये. किमान 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय व बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये. हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे लावावे. यासाठी कृषी खात्याकडून विनामूल्य कागद मिळेल. तसेच बियाण्यांसाठी जादा पैसे कोणी देऊ नये. कृषी केंद्रानी कोणत्याही प्रकारे शेतकर्यांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या केंद्रात खते, बियाणासाठी जादा पैशांची आकारणी करतील त्यांचे परवाने रद्द करून कडक कारवाई केली जाईल.
– बाळकृष्ण कदम, तालुका कृषी अधिकारी
हेही वाचा