...अन् कोरडी पडलेली हिरण्यकेशी झाली प्रवाहित; पूर्ववाहिनी नदीचा पश्चिमेकडे उलटा प्रवास, ग्रामस्‍थांमध्ये कुतूहल | पुढारी

...अन् कोरडी पडलेली हिरण्यकेशी झाली प्रवाहित; पूर्ववाहिनी नदीचा पश्चिमेकडे उलटा प्रवास, ग्रामस्‍थांमध्ये कुतूहल

नूल ; संजय थोरात : महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर शनिवारी सायंकाळी अचानक झालेल्या धो-धो पावसामुळे कोरड्या पडलेल्या हिरण्यकेशी नदीचे पात्र पश्चिमेच्या दिशेने उलटे वाहू लागले अन् ही निसर्गाची किमया शेकडो ग्रामस्थांनी अनुभवली.

त्याचे असे झाले : हिरण्यकेशी नदीतील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे भडगावपासून नांगनूरपर्यंतचे नदीचे पात्र कोरडे पडले आहे. परिणामी बळीराजाची चिंता वाढली आहे. अशा चिंताग्रस्त वातावरणात सीमा भागातील नागरिकांना सुखद अनुभव आला. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पूर्व भागात अचानक काळवंडून आले. ढग काळेकुट्ट बनले आणि क्षणार्धात पावसाला सुरुवात झाली. बघता बघता पावसाने रौद्र रूप धारण केले.

नांगनूर, संकेश्वर, अरळगुंडी, हेब्बाळ, गोटूर, कमतनूर आदी भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. महामार्गावरील गडहिंग्लज ब्रिजखालून पाण्याचे लोट वाहू लागले. लहान-मोठे प्रवाहित झालेले ओढे नदीपात्रात येऊन मिळाले. खणदाळपासून पश्चिमेस पावसाचा थेंबही नव्हता. त्यामुळे पश्चिमेकडे नदी पात्र कोरडे असल्याने पूर्वेकडे झालेल्या पावसामुळे नदीचे पात्र अचानक प्रवाहित झाले आणि पूर्ववाहिनी हिरण्यकेशीने पश्चिमेकडे उलटा प्रवास सुरू केला.

Back to top button