सोलापूर : मोटारसायकलला पिकअपची धडक; दाम्‍पत्‍याचा मृत्‍यू

ऊस-तोड मजुरांच्या ट्रॅक्‍टरला धडकेत ४ जण ठार
ऊस-तोड मजुरांच्या ट्रॅक्‍टरला धडकेत ४ जण ठार

करमाळा ; पुढारी वृत्‍तसेवा मोटारसायकलला पाठिमागून धडक दिल्याने घरगुती मेस चालवणा-या व्यवसायिक दाम्‍पत्याचा मृत्यू झाल्‍याची घटना घडली. मनोज काळे गुरव (वय ४८) व पुष्पा मनोज काळे (वय ४२, रा. किल्ला वेस, करमाळा) असे मृताचे नाव आहे. या अपघातात पुष्पा काळे या जागीच ठार झाल्या. तर मनोज काळे यांचा उपचारादरम्यान बार्शी येथे मृत्यू झाला आहे.

माढ्यातील नातेवाईकांकडून मोटारसायकलवरून परतताना या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. यामध्ये पत्नी पुष्पा या जागीच ठार झाल्‍या, तर पती मनोजचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. कुर्डुवाडी- करमाळा मार्गावर सालसे चौकात एका पिकअप वाहनाने या दुचाकीला पाठिमागून धडक दिली होती.

हे काळे दाम्पत्य माढा येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवर गेले होते. तेथून परत येत असताना सालसे चौकात पिकअपने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने अपघात झाला होता. त्यात मनोज काळे हे गंभीर जखमी झाले होते . त्यांना करमाळ्यात प्रथम उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात आणले. तेथून त्यांना बार्शी येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. दरम्यान त्यांचा बार्शी येथे मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर उपजिल्हा रुग्णालयात हे दोन्ही मृतदेह आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

संबधित चालकाला तात्काळ अटक करून कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. त्या शिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे दुपारपर्यंत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पडून होते. पोलीस ठाण्यातही नातेवाईकांनी व आप्तेष्टानी मोठी गर्दी केली होती. या अपघातात कष्टकरी दाम्‍पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काळे दाम्‍पत्‍याच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. दरम्यान करमाळा पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या अपघात प्रकरणी पोलिस निरिक्षक जोतिराम गुजंवटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news