सिंधुदुर्ग : आंगणेवाडीच्या यात्रेला लोटणार भक्तांचा महापूर

सिंधुदुर्ग : आंगणेवाडीच्या यात्रेला लोटणार भक्तांचा महापूर
Published on
Updated on

सिंधुदुर्ग,(संतोष अपराज) :  दक्षिण कोकणची काशी आणि कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून राज्यभर गणल्या गेलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक आतुर झाले आहेत. वस्त्रालंकारांनी नटलेल्या देवीचे रूप पाहण्याचे भाग्य या यात्रोत्सवानिमित्त मिळणार असल्याने शनिवारी (दि.४) संपन्न होणाऱ्या यात्रेला आंगणेवाडीत भक्तांचा महापूर लोटणार आहे.

दरवर्षीप्रमाणे भराडी मातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेली तयारी आंगणे कुटुंबीय,  जिल्हा प्रशासन यानी पूर्ण केली आहे. एकूणच भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यांनी आंगणेवाडी व परिसर गजबजून गेला आहे. यात्रेत १२ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

देवी भराडीचा महिमा जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. त्यामुळे आंगणेवाडीच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. यात्रोत्सवाच्या निमीत्ताने सुवर्ण अलंकाराने भरजरी साडी नेसवून मातेला सजविण्यात येणार आहे. यात्रे दिवशी मातेचे तेजोमय रुप पाहून भाविक सुखावणार आहेत. गाभाऱ्यात ओट्या भरण्यासाठी शिस्तबध्द नियोजन आंगणे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. सभामंडप व गाभाऱ्याचे रुप रेशमी कापडी पडदे, विविध फुलांच्या सजावटीने अवर्णनिय असेच भासणार आहे.

यात्रोत्सवास ओट्या भरण्यास पहाटे तीन वाजता प्रारंभ होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर सजविण्यात आला आहे. भाविकाना मौज घडवून आणण्यासाठी आकाश पाळणी, मौत का कुआ वैगरे मनोरंजनाची खेळणी सज्ज झाली आहेत. मालवण, मसुरे व कणकवली स्टँड नजिक पार्कींग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने सुध्दा अखंडीत वीज पुरवठ्यासाठी खबरदारी घेतली आहे. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ६ अभियंता, ४० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. मालवण एसटी आगाराच्या वतीने ५० यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे

मंदिर व मंदिर परिसरात ३५ ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्या द्वारे यात्रेचे छायाचित्रण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे. मोबाइल स्वछता गृह उभारण्याचे काम पूर्णत्वास जात आहे. हंगामी जिओ टॉवर उभारण्यात आला असून सदर टॉवर गुरुवारी कार्यन्वित झाला आहे. विज वितरण कंपनी कडून हंगामी व्यापाऱ्यांना तात्पुरते वीज कनेक्शन देणे चालू आहे.  कोणताही गैर प्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभागाकडून बंदोबस्त राहणार आहे. तसेच टेहळणी टॉवर, साध्या वेशातील महिला व पुरुष कर्मचारी यात्रेवर लक्ष ठेवून असणार आहेत. महनीय व्यक्ती साठी मुख्य स्वागत कक्षा लगतच खास व्यवस्था करण्यात आली आहे.

देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी नऊ रांगांमधुन व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या शनिवारी रात्री ९.३० ते १२ या वेळेत धार्मिक विधीसाठी भाविकांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व भाविकानी संयम व शिस्त बाळगुन देवीचे दर्शन रांगेतूनच घेण्याचे आवाहन  मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यानी केले आहे.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news