जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पक्षिप्रेमींचे नेहमीच आकर्षण ठरणारे फ्लेमिंगो पक्षी जयाद्री खोर्यातील जेजुरीनजीकच्या कर्हा नदीच्या मल्हार सागर धरणावर प्रथमच आल्याचे दिसून आले आहे. साधारणत: थंडीच्या काळात युरोप खंडातील मंगोलिया येथून हे पक्षी लाखो मैलांचा प्रवास करून राज्यातील विविध जलाशयांत येत असतात. परंतु, वेळेच्या खूप अगोदर फ्लेमिंगोसोबतच स्पून बिल, चित्रबलाक, ग्रेहोण निळ्या पायाचे शेकाटे, असे विविध विदेशी पक्षी जलविहार करताना नाझरे धरणाच्या जलाशयात आढळून येत आहेत.
सध्या या धरणात अत्यंत अल्प पाणीसाठा असूनही हे पक्षी एवढे स्थलांतर करून येथे आले आहेत. साधारणतः 70 हून अधिक फ्लेमिंगो पक्षी पाहण्यास मिळत आहेत. महिनाभरापेक्षा कमीच पाणीसाठा उरला असून, साठा संपल्यास हे पक्षी उजनी अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इस्राईल तसेच भारताच्या राजस्थान आणि गुजरात राज्यांतूनदेखील हे पक्षी स्थलांतर करीत असतात. यापूर्वी मुंबई तसेच उजनी धरण परिसरात दरवर्षी हे पक्षी येतात. परंतु, वेळेच्या अगोदर आणि पहिल्यांदाच जेजुरीतील मल्हार सागर धरण परिसरात हे आढळून आल्याने पक्षिमित्र अभ्यासकांनी कुतूहल व्यक्त केले आहे.
हेही वाचा