पुढारी ऑनलाईन : आशिया चषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आहेत. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनीही अर्धशतक झळकावले. मात्र यानंतर दाेघेही झटपट बाद झाले. यानंतर विराट काेहली आणि केएल राहुल यांनी धावांची गती कायम ठेवली. २४ षटकांचा खेळापर्यंत भारताने दोन गडी गमावत १४७ धावा केल्या. मात्र यानंतर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आहे.
रोहित शर्मानंतर शुभमन गिलही बाद झाला. शाहीन आफ्रिदीने त्याला आगा सलमानकरवी झेलबाद केले. गिलने 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या.
121 धावांवर भारतीय संघाची पहिली विकेट पडली. कर्णधार रोहित शर्मा 49 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. शादाब खानने त्याला फहीम अश्रफकडे झेलबाद केले. रोहितने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले. 17 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 122 धावा होती.
कर्णधार रोहित शर्माने संथ सुरुवातीनंतर गियर बदलला आणि 42 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने शेवटच्या पाच चेंडूत 26 धावा केल्या आहेत. त्याचेही हे स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने नेपाळविरुद्ध नाबाद 74 धावा केल्या होत्या. तर वनडे कारकिर्दीतील 50 वे अर्धशतक आहे. टीम इंडियाने अवघ्या 14 षटकांत 100 धावा पार केल्या. तर 15 षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता 115 धावा केल्या.
शुभमन गिलने 37 चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने नेपाळविरुद्ध 67 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
रोहितने 13व्या षटकात शादाबच्या शेवटच्या तीन चेंडूंवर दोन षटकार आणि एक चौकार लगावला. शादाबच्या या षटकात 19 धावा वसूल झाल्या.
टॉस गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलने टीम इंडियाला वेगवान सुरुवात करून दिली. रोहितने पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदीविरुद्ध षटकारही ठोकला. शाहीनच्या 2 षटकांत गिलने 3-3 चौकार मारले. संघाने 10 षटकांनंतर बिनबाद 61 धावा केल्या.
भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर हा सामना खेळत नाहीये. त्याच्या जागी विकेटकीपर केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी ऐवजी पुन्हा जसप्रीत बुमराहला खेळवण्यात आले आहे. दरम्यान, आता टीम इंडियात कोणाची बॅटिंग ऑर्डर काय आहे हे पाहणे रंजक ठरणार आहे. इशानला चौथ्या तर राहुलला पाचव्या क्रमांकावर पाठवले जाईल का? की राहुल चौथ्या क्रमांकावर येईल आणि इशान पाचव्या क्रमांकावर मैदानात उतरेल? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
पाकिस्तानचा कर्णधार बाबरने शनिवारीच त्यांच्या प्लेइंग-11 ची घोषणा केली होती. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, फहीम अश्रफ, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शहा.
गेल्या वेळी जेव्हा हे दोन्ही संघ ग्रुप स्टेजमध्ये आमनेसामने आले होते तेव्हा पावसामुळे सामना अनिर्णित राहिला होता. टीम इंडियाने त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 266 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे पाकिस्तानला फलंदाजीची संधी मिळाली नाही. आता या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत.